योगेश पायघन
Chhatrapati Sambhajinagar News : दिव्याखाली अंधार म्हणतात ते काही खोटं नाही. संपूर्ण राज्यातील समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांचा कायापालट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना त्यांच्याच छत्रपती संभाजीनगरात मोठा धक्का बसला आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने सामजिक न्याय विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पाच वसतीगृहांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी शासकीय वसतीगृहावर धडक देत तेथील दुरावस्था पाहून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली होती. त्याचवेळी राज्यातील सर्वच वसतीगृहांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची घोषणा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली. पण दोन महिन्यातच शिरसाट पालकमंत्री असलेल्या संभाजीनगरमधील पाच वसतीगृहांची वीज कट झाल्याने त्यांच्या खात्याची नाचक्की झाल्याची चर्चा होत आहे.
समाज कल्याण विभागाच्या बजेटला सात हजार कोटींनी कट लावण्यात आल्यामुळे मंत्री संजय शिरसाट नाराज आहेत. (Shivsena) नियमानूसार समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या निधीला कात्री लावता येत नाही, यासंदर्भात आपण अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले होते. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशातच आता वीज बील न भरल्यामुळे वसतीगृहांची वीज कट केली जात असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नूकसान होत आहे.
ऐन परिक्षेचे आणि उन्हाळ्याचे दिवस असताना महावितरण विभागाच्या या कारवाईने समाज कल्याण विभागाला मोठा झटका बसला आहे. समाजकल्याण विभागाचे एक हजार विद्यार्थी क्षमतेचे पाच वसतीगृहांचे येथे युनीट आहे. त्याचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कापला गेला. त्यामुळे उन्हाचा पारा चढलेला असतांना परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. विद्यार्थ्यांनी अक्षरश: खोली बाहेर रात्र जागून काढावी लागली.
बावीस तासानंतर शनिवारी दुपारी दोन वाजेच्यासुमारास विद्युत पुरवठा सुरळीत झाला. समाजकल्याण विभागाने वीजेचे बील भरले नसल्याने हा वीजपुरवठा खंडीत झाला असल्याची माहीती येथील गृहपालांनी दिली. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी 24 डिसेंबर 2024 रोजी किलेअर्क येथील वसतीगृहाची पाहणी करत संताप व्यक्त केला होता. पालकमंत्री आणि समाजकल्याण मंत्री येथीलच असल्याने या वसतीगृहाचे रूप पालटेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र, तीन महिने सरले अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्र कशी बशी विद्यार्थ्यांनी काढली. मात्र, मोबाईल चार्जींग संपली. लाईट नसल्याने वापरण्याचे पाणी वर चढवल्या गेले नसल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहासाठी, अंघोळीसाठी पाणी बादलीने न्यावे लागले. तर काही विद्यार्थी मित्र, नातेवाईकांकडे गेले. मात्र, शहरात कुणीच नाही अशा विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. पदवीचे प्रात्यक्षिक सुरू आहे, लेखी परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होत आहेत. तसेच सीईटी, नीट, जेईईची तयारी अंतीम टप्प्यात असतांना विद्यार्थ्यांना या समस्यातून बाहेर काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
गृहपाल इम्रान फारूकी म्हणाले, वीजेचे बील भरले नसल्याने पाचही युनीटची वीज कापली गेली आहे. दोन तासात सुरू होईल. मागे काही बील भरले मात्र, निधी नाही, त्यात मार्च अखेर असल्यामुळे अडचण आहे. दरम्यान, समाज कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान, थकीत 26 लाखांच्या वीजबीलापोटी 16 लाख रुपये भरल्यानंतर दुपारी वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला असल्याची माहिती अधिक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी सांगितले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.