Congress: 'गद्दारांची मांदियाळी असताना..' राहुल गांधींनी शरद पवारांचा हात घट्ट पकडलेला फोटो व्हायरल; डिलिमिटेशनवरून काँग्रेसचा व्हिडिओ

Sharad Pawar NCP Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलावर राष्ट्रवादीच्या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसची भावनिक पोस्ट चर्चेत; राहुल गांधींचा शरद पवारांसोबतचा फोटो व्हायरल.
Sharad Pawar NCP Delimitation Bill
Sharad Pawar NCP Delimitation BillSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delimitation Controversy: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि आता परिसीमन विधेयकावरून निर्माण झालेली राजकीय चर्चा, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत काही दिवसापासून मिळत आहे. पक्षाच्या नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमधून काँग्रेसने शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांचा एक भावनिक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

या फोटोमध्ये राहुल गांधी यांनी शरद पवार यांचा हात घट्ट पकडलेला दिसत आहे. दिल्लीत टिपण्यात आलेल्या या छायाचित्रासोबत काँग्रेसने, 'गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता', अशी कॅप्शन दिली आहे. परिसीमन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर झाल्याने राजकीय वर्तुळात तिचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

काँग्रेसने करून दिली राज्यसभा निवडणुकीची आठवण

महाराष्ट्र काँग्रेसने दुसऱ्या पोस्टमधून मार्च 2026 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ दिला आहे. शरद पवार यांना वयाच्या 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता, असे पक्षाने म्हटले आहे.

त्यावेळी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे केवळ 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. दुसरीकडे काँग्रेसकडे 16, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 20 आमदार होते.

Sharad Pawar NCP Delimitation Bill
Sharad Pawar NCP: लोकसभेत नेमकं काय घडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खासदारांना बजावला 3 ओळींचा व्हिप; 5 दिवस उपस्थिती बंधनकारक

शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवून पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही साथ दिली आणि महाविकास आघाडीकडून पवार यांच्या उमेदवारीवर एकमत झाले.

Sharad Pawar NCP Delimitation Bill
Shiv Sena News: 'सत्तेचा निर्णय अंतिम नसतो!' एकनाथ शिंदेंनाच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं आव्हान; थेट हायकोर्टात धाव!

आता परिसीमन विधेयकावरून काँग्रेसचा सवाल

आता मात्र परिस्थिती बदलल्याचे चित्र असल्याचा अप्रत्यक्ष संदेश काँग्रेसच्या पोस्टमधून देण्यात आला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकावर एनडीए सरकारला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत पक्षातील नेत्यांकडून मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका पक्षाला घ्यावी लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केलेला 'आणि आता काय?' हा सवाल विशेष चर्चेत आला आहे.

राज्यसभेच्या वेळी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या काँग्रेसने आता त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेवरून जुन्या सहकार्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे परिसीमन विधेयकाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्येही राजकीय अंतर वाढणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.