सदानंद पाटील
Sharad Pawar News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (व्हीएसआय) मिळालेल्या शासकीय अनुदानाचा वापर मूळ उद्देशानुसार केवळ संशोधनासाठीच झाला असल्याचा अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढला आहे. शासनाकडून प्राप्त निधी व्यतिरिक्त संस्थेने संशोधन कार्यासाठी स्वनिधीतून तब्बल ५३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी खर्च केल्याचेही या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चेत राहिलेल्या या चौकशीनाट्यावर अखेर पडदा पडला आहे.
वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'व्हीएसआय'ला दिलेल्या शासकीय अनुदानाचा हिशेब घेतला जाईल, अशी घोषणा केली होती. राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप झालेल्या प्रतिटन उसामागे एक रुपया कपात करून संस्थेला दिला जातो; त्यामुळे या निधीच्या उपयोगाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर २०२५ रोजी 'व्हीएसआय'च्या अनुदान विनियोगाची चौकशी करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
साखर आयुक्तांच्या समितीने सर्व आर्थिक बाबींची कसून छाननी करून आठ जुलै २०२६ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालातील आकडेवारीनुसार, २००९-१० ते २०२४-२५ या कालावधीत 'व्हीएसआय'ला सरकारकडून एकूण १३१.३५ कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान मिळाले होते. मात्र, या काळात संस्थेने मूळ संशोधन (१८४.३८ कोटी रुपये) आणि सहयोगी संशोधन (१७५.१७ कोटी रुपये) मिळून तब्बल ३५९.५५ कोटी रुपयांचा खर्च केला. म्हणजेच, सरकारी अनुदानापेक्षा ५३.०३ कोटी रुपये अधिक रक्कम संस्थेने स्वतःच्या गंगाजळीतून संशोधनावर खर्च केली. त्यामुळे शासकीय अनुदानाचा विनियोग उद्देशानुसारच झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट उसाच्या क्षेत्रात अत्यंत उत्तम संशोधन करत आहे. शासकीय अनुदानापेक्षा सुमारे ५३ कोटी रुपये अधिकचा निधी संस्थेने स्वतःच्या स्वनिधीतून संशोधन कार्यासाठी वापरला आहे. या संशोधनाचा थेट फायदा राज्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांना होत आहे. चौकशी अहवालामुळे निधीच्या योग्य विनियोगावर शिक्कामोर्तब झाले असून, संस्थेवरील विश्वास अधिक द्विगुणित झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.