
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात गरमागरमी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबची कबर उखडून फेका, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. रस्त्यावर उतरून महाराष्ट्रात ठीकठिकाणी आंदोलने सुरू असून नागपुरात याच मुद्द्यावरून दंगल उसळली.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी, "औरंगजेबची कबर उखडून फेकायची की तशीच ठेवायची? याचा निर्णय आमच्या देवाभाऊंनी घ्यावा", असा टोला लगावला आहे. औरंगजेब कबरीच्या वादावरून जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडत चालले आहे.
दुर्दैवाने त्या औरंग्याची कबर आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथेच आहे. याच खुलताबाद रत्नपुरमध्ये जागृत असे भद्रा मारुतीचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराचे मंदिर, वेरूळच्या ऐतिहासिक लेण्या देखील आहेत.
औरंगजेबच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे येथील नागरिक आणि भाविकांमध्ये तसेच पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हनुमान जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भद्रा मारुती संस्थांनच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जाते. यंदा औरंगजेब कबरीच्या वादावरून बिघडलेले वातावरण आणि तणावाची परिस्थिती यामुळे हनुमान जयंतीच्या उत्साहावर कुठलेही सावट असू नये, अशी भद्रा मारुती संस्थांनचा विश्वस्त म्हणून माझी इच्छा आहे.
जिल्ह्यातील नव्हे मराठवाडा, महाराष्ट्रातील सर्व हनुमान भक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी दरवर्षीपेक्षा मोठ्या उत्साहात यंदाची हनुमान जयंती साजरी करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल,असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका याआधीच स्पष्ट केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून येथील सोनेरी महलमध्ये औरंगजेबाने कैद करून ठेवले होते.
त्यांचा छळ केला अशा औरंग्याचे नाव या शहराला नको अशी, स्पष्ट भूमिका 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील विजयी सभेत मांडली होती. आणि तेव्हाच या शहराचे नाव संभाजीनगर केले होते.
ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांना छळले त्यांची क्रूरपणे हत्या केली, त्या औरंगजेबाची कबर इथे असूच नये,अशी आमची भूमिका आहे. परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच आमचे देवाभाऊ आहे, तेव्हा औरंगजेबाच्या कबरीचे काय करायचे? याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असेही खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान वेरूळ येथे घृष्णेश्वराच्या आणि खुलताबादला भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्याभाविक तसेच वेरूळ लेण्या पाहण्यासाठी जगभरातून दाखल होणाऱ्या पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
ही संख्या देखील गेल्या काही दिवसात घटली आहे. औरंगजेब कबरीवरून दूषित झालेले छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रातील वातावरण पूर्ववत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे ती त्यांनी करावी, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.