बंडखोरी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी बुधवारी(ता.30) रात्री उशिरा महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तीनही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच मनसेच्या अमित ठाकरेंच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या माहिम मतदारसंघावरही या बैठकीत तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला आहे. त्यामुळे आता बंडखोरांसोबत वन टू वन संपर्क साधला जाणार आहे. येत्या काळात नाराजीचे कारण समजून घेत पक्षश्रेष्ठी बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 5 नोव्हेंबरपासून राज्यात सभांना सुरुवात होणार आहे.येत्या 5 नोव्हेंबर रोजी ठाकरेंची पहिली रत्नागिरी येथे जाहीर सभा होत असून 17 नोव्हेंबर रोजी त्यांची मुंबईत सांगता सभा होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 16 नोव्हेंबर त्यांची मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या ठाण्यात सभा होणार आहे.उद्धव ठाकरे यांच्या या काळात 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्यामध्ये मविआच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सात सभा होणार आहे. 12, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी मोदींची तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. पुण्यात 12 नोव्हेंबरला त्यांची सभा होणार आहे. सलग तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेवटची सभा होईल. पुण्यात मोदींचा मुक्काम असेल, अशी माहिती आहे.
माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजप पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचं वक्तव्य खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना शिंदे गटाते उमेदवार सदा सरवणकर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये काही जागांवरून वाद असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आमच्यात कोणतेही मतभेत नाहीत, असं सांगितलं आहे. तसंच 'मविआ'त कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकसभेला निष्ठावंताची हत्या झाली आणि आता विधानसभेलाही निष्ठावंतांची हत्या करण्यात आली, असा आरोप करत महाविकास आघाडीतील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार आबा बागुल हे आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय अजूनही वेळ गेली नाही,मला पुरस्कृत करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ऐन दिवाळीत सर्वसामान्य माणसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल स्वस्त करून शिंदे सरकार लोकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे यांच्या नावाचे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आपल्या नावाचा आणखी एक उमेदवारी अर्ज येण्यास समीर भुजबळ कारणीभूत असून ही त्यांचीच खेळी असल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे.
राज्यात आचारसंहिता लागली असताना पोलिसांकडून अनेक तपासणी पथक तैनात करण्यात आली आहेत. यावेळी पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. अशातच लखडगंज पोलिसांनी मोठी कारवाई करत14 लाखांची रोकड जप्त केली आहे.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला याबाबतचा एक मेल आला आहे. यामध्ये सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 2 कोटी रुपयांची खंडणी देखील मागितल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 31 ऑक्टोबरला इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर 1 नोव्हेंबरला ते मोठा निर्यण घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत ते जातीय समीरणाबाबत निर्णय घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल होते. त्यांच्याशी कुटुंबियांचा संपर्क होत नव्हता. अखेर तब्बल 36 तासांनंतर त्यांचा कुटुंबियांशी संपर्क झाला असून आपण सुखरुप असल्याचं त्यांनी घरच्यांना सांगितलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. त्यामुळे मंगळवारी राज्यातील अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानुसार 288 जागांसाठी 7995 उमेदवार रिंगणात असून याबाबतचे एकूण 10 हजार 900 अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.