Sharad Pawar : पवारांच्या एका फोनने एस. एम. जोशींचं मुख्यमंत्रीपद हुकलं...

S. M. Joshi : महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती एस. एम. अण्णांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळे झाली होती. म्हणून त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वच पक्षातील आमदारांची सर्वसाधारण भावना होती.
S.M. Joshi, Sharad Pawar
S.M. Joshi, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

- कुमार सप्तर्षी

महाराष्ट्राच्या विधानसभेत 1978 मध्ये आमदार म्हणून माझा प्रवेश झाला. शपथ घेताना मी म्हणालो, ‘‘महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रगल्भ झालेल्या माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मी शपथ घेतो की...’’ याचं कारण होतं माझी धारणा होती की प्रत्येकाला चिंतन करून विवेकबुद्धी प्रगल्भ करावी लागते. ती आपोआप वा जन्मवत नसते. यावर काही वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी टीका केली. कारण शपथेमध्ये ‘ईश्वराला स्मरून’ याला पर्याय म्हणून ‘विवेकबुद्धीला स्मरून’ असा मजकूर होता. हे शपथेत अधिक झाले असा त्यांचा दावा होता.

आमचा जनता पक्ष विधानसभेत सर्वाधिक संख्येचा. म्हणजे 105 आमदारांचा होता. जनता पक्ष, शेकाप, रिपब्लिकन, कम्युनिस्ट अशी निवडणूक पूर्व आघाडी होती. या आघाडीच्या आमदारांची संख्या 138 होती. सदनात 12 अपक्ष आमदार होते. त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा नव्हता. हे 12 आमदार जनता पक्षाच्या आघाडीत सामील झाल्यावर आमचे बहुमत होऊन सरकार स्थापन झाले असते. पण एक अडचण होती. त्या सर्वांनी एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री बनावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना एस. एम. अण्णांच्या भेटीला घेऊन जात असे. ते अण्णांच्या पाया पडत व पाठिंबा दर्शवित.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती एस. एम. अण्णांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळे झाली होती. म्हणून त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वच पक्षातील आमदारांची सर्वसाधारण भावना होती. पंतप्रधान मोरारजी भाईंनी सादिक अली राज्यपाल नेमलेले होते. सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एस. एम. जोशी यांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण द्यायला हवे होते. त्यानंतर पुढील सोपस्कार सोपे झाले असते. एस. एम. अण्णांमध्ये एक सुप्त आत्मलोपी जातिवाद होता. ते आपल्या आयुष्यात महाराष्ट्र राज्य निर्माण करू शकले.

S.M. Joshi, Sharad Pawar
Sharad Pawar MLA : टोकाची टीका केल्यानंतर शरद पवारांच्या आमदाराचा अजितदादांसोबत एकाच गाडीने प्रवास; मोठी खलबतं ?

पण 1962 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षातून फुटलेल्या त्यांच्याच पट्टशिष्याने समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव केला होता. राम तेलंग हे काँग्रेसतर्फे शुक्रवार पेठ मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्र राज्य 1960 मध्ये निर्माण झाले. त्या आधीच्या द्विभाषिक राज्यात गुजरातमधून काँग्रेसचे बहुसंख्य आमदार निवडून आलेले. महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचा विरोधकांनी पराभव केलेला. गुजराती आमदारांच्या बळावर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले होते. 1960-62 या दोन वर्षांच्या काळात विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून यशवंतरावांनी पक्षाचा विस्तार केला होता. त्यामध्ये एस. एम. जोशी ब्राह्मण आहेत हाच त्यांच्या शिष्यांनी आरोप केला होता.

पण 1978 मध्ये एस. एम. जोशी यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. पण त्याचवेळी काळजीवाहू सरकारचे गृहमंत्री शरद पवार होते. एकदा रात्री त्यांनी राज्यपाल सादिक अली यांना फोन केला. ‘‘माझ्याकडे बातमी आली आहे की युवक काँग्रेसचे लोक तुम्हाला काळं फासण्यासाठी राजगृहात घुसणार आहेत. सभागृहातील मोठा पक्ष म्हणून सर्वाधिक संख्या असलेल्या पण अल्पमतातल्या जनता पक्षाला सरकार बनवण्याकरिता तुम्ही निमंत्रण देणार आहात. ते बरोबरच आहे. पण ही तरुण पोरं फार आक्रमक आहेत.’’ असे पवार यांनी राज्यपालांना सांगितले. या फोनमुळे राज्यपालांची चलबिचल झाली आणि त्यांनी जनता पक्षाचे नेते ‘एस. एम.’ यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण दिलेच नाही. निमंत्रण आले असते तर आघाडीचे 138 आणि 12 अपक्ष अशा 150 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र एस. एम. सादर करू शकले असते.

या 2-3 दिवसांच्या काळात वसंतदादांनी 12 अपक्ष आमदार उचलून पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. वसंतदादांनी त्यांच्या स्वर्णसिंग काँग्रेस (सी), इंदिरा काँग्रेसचे तिरपुडे यांच्याबरोबर युती केली. दोघे तातडीने दिल्लीला गेले. हे दोन काँग्रेसचे तुकडे एकमेकांविरुद्ध लढले होते. वसंतदादा मुख्यमंत्री व तिरपुडे उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला इंदिरा गांधींपुढे ठेवण्यात आला. त्यांनी दादांना एकच प्रश्न विचारला की ‘‘दादा तुमची निष्ठा कुणाला राहील?’’ वसंतदादांनी तत्काळ उत्तर दिले, ‘‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत माझी निष्ठा तुमच्यावर असेन.’’ याचा अर्थ ही युती होण्यापूर्वी इंदिरा गांधींनी हे सरकार यशवंतराव चव्हाणांचे नसेल याची खात्री करून घेतली होती. वसंतदादांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्यानंतर मी त्या आमदारांना भेटलो. त्यांच्यात अपराधी भावनेचा लवलेश नव्हता.

वसंतदादांचे सरकार रडतखडत वर्षभर चालले. इंदिरा काँग्रेसचे तिरपुडे खूपच आक्रमक होते. ते उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री वसंतदादांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्नात असायचे. नेमक्या त्याच काळात यशवंतरावांच्या गटाचे काँग्रेसवाले म्हणजेच शरद पवार, गोविंदराव आदिक, सुशीलकुमार शिंदे वगैरे फुटणार होते. यशवंतराव व चंद्रशेखर यांची बोलणी चालू झाली. इंदिरा काँग्रेस हा पक्ष सत्तारूढ नसताना मुंबईतून उपमुख्यमंत्री तिरपुडे यांच्या माध्यमातून कारवाया आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार पाडणे गरजेचे आहे, अशी सर्वांची भूमिका होती.

S.M. Joshi, Sharad Pawar
Sharad Pawar NCP: शरद पवार पुन्हा मैदानात; फडणवीस सरकारला आपली ताकद दाखवणार; घेतला 'हा' मोठा निर्णय

त्यानंतर वसंतदादा सरकार पाडून पुलोद आघाडीचे शरद पवार सरकार सत्तेवर आले. त्यामुळे जनता पक्षही सत्तेवर आला. महाराष्ट्रातील समाजवादी गटाला मिळालेली सत्तेची ही एकमेव संधी म्हणून इतिहासात नोंद होईल. महाराष्ट्रात तत्कालीन जनसंघाला विशेष थारा नव्हता. जनता पक्षांतर्गत त्यांचा महाप्रयत्न चालू होता की पक्षाचं नेतेपद समाजवादी विचाराच्या व्यक्तीकडे जाता कामा नये. जनता पक्षाचे 105 आमदार तीन गटात विभागले होते. समाजवादीचा गट सर्वाधिक संख्येचा, नंतर दुसरा गट माजी जनसंघियांचा, तिसरा गट होता तो काँग्रेसमधून, जनता पक्षात आलेल्या आणि आमदार झालेल्या कार्यकर्त्यांचा.

मग मी जनसंघ व समाजवादी यापैकी कुणात नसलेल्या लोकांचा एक गट निर्माण केला. त्यांची निष्ठा फक्त जनता पक्षाला आणि राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर यांना असेल असे ठरले होते. माझा गटही प्रभावी असल्याने मी विधिमंडळ जनता पक्षाचा सचिव झालो. माझे काम एकही आमदार फुटू द्यायचा नाही हे होते. ते मी निष्ठेने पार पाडले. शरद पवार मुख्यमंत्री या नात्याने मी सादर केलेल्या कामाला सदैव पाठिंबा देत. त्याची दोन कारणे होती. एक, मी 105 आमदारांच्या जनता पक्षाचा विधिमंडळ सचिव होतो. दुसरे कारण, मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नामांतर करण्याच्या निर्णयात आम्ही सख्खे कॉम्रेड म्हणून वागत होतो. एक तिसरेही कारण होते. पण ते मामुली होते. 1960 पासून आम्ही समवयस्क दोस्त म्हणून संवादात होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com