
Budget 2025 : महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोध पक्षाकडून तिखट प्रतिक्रिया आल्या. सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेत महाराष्ट्रावर कर्ज वाढवणारा, अनावश्यक गोष्टींवर अधिक खर्च करणारा आणि शाश्वत विकासासाठी कुठल्याच तरतुदी न करणारा निराशाजनक असल्याचे मत विरोधी बाकावरून मांडण्यात आले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कविता म्हणत सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पावर टीका करतांना कवितेचाच आधार घेतला.
स्वार्थ हाच या सरकारचा संकल्प, स्वार्थाचाच या सरकारला ध्यास, राज्य लुटण्याला देऊ गती साधूया प्रगती विघाताची, अशा शब्दात अर्थसंकल्पाची चिरफाड केली. राज्य शासनाने सादर केलेला (Budget) अर्थसंकल्प महाराष्ट्रावर कर्ज करणारा आहे. पायाभूत,भांडवली आणि मूलभूत विकासावर खर्च करण्याऐवजी अनावश्यक घोषणांवरती जास्त खर्च करण्यात आला आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्या पाहिजे होत्या, त्या केल्या गेलेल्या नाहीत, असे दानवे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकत नाही. या अर्थसंकल्पात अक्षरशः घोषणांचा पाऊस पडला आहे. (Ambadas Danve) मराठवाडा आणि विदर्भासाठी या अर्थसंकल्पात अल्प अशी तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे राज्याला प्रगतीकडे नेण्याच्या बाता मारणारे सरकार महाराष्ट्र राज्य लाॅटरी बंद करून उत्पन्नाचे स्त्रोत बंद करत आहे.
महाराष्ट्र राज्याची लॉटरी बंद करण्याचा प्रयत्न काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला होता. महाराष्ट्र राज्याची लॉटरी बंद करून नागालँड राज्याची लॉटरी सुरू करण्याची एक अजबच कल्पना मांडण्यात आली. राज्य सरकार अशाप्रकारे राज्यातील एकेक उद्योग बंद करून उत्पन्नाचे स्रोत बंद करत असल्याने नुकसान होत आहे, याकडे अंबादास दानवे यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठासाठी समांतर पाणी योजना मंजूर करण्यात आली होती, अंतिम टप्प्यात या योजनेची काम असून राज्य सरकारने महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने 800 कोटी रुपयांचा हिस्सा राज्य सरकारने उचलावा, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. हळद संशोधन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असली तरीही पुरेसे कर्मचारी आणि कार्यालयासाठी जागा उपलब्ध नाहीये. राज्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन घेतले जाते. आगामी काळात हळद संशोधन विकास महामंडळासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात यावी, याकडेही दावे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांना दिलेला शब्द विसरले..
दरम्यान, अंबादास दानवे हे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित मुंबई येथील आझाद मैदानावरील धडक मोर्चात सहभागी झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सदरील शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार असल्याचा शेतकऱ्यांना शब्द दिला होता. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर आता या सरकारला आपल्या शब्दाचा विसर पडला आहे.
शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग करत असेल तर शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणी विधान परिषद सभागृहात स्थगन प्रस्ताव दिला असल्याचेही दानवे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.