

Mumbai News: अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन अल्पसंख्याक विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे, विविध शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र विद्यार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत व शिष्यवृत्ती देणे, मौलाना आझाद शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र उर्दू अकादमीच्या उपक्रमांचा सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करणे, तसेच उर्दू भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली.
अल्पसंख्याक कल्याणकारी योजनांचे लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचीही मागणी करण्यात आली.हज समितीमध्ये हज यात्रेकरूंच्या सेवेसाठी सेवकांच्या निवड प्रक्रियेत पात्र शिक्षकांना संधी, पारदर्शकता व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, तसेच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना शंभर टक्के शिक्षक भरतीचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली.
शैक्षणिक प्रश्नांमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त झालेल्या सुमारे बत्तीस हजार शिक्षकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणे व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनाही निवृत्तिवेतनाबाबत दिलासा देणे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व सेवा कालावधीत कमी करणे,खासगी शैक्षणिक संस्थांना वीस टक्के अतिरिक्त अनुदानाचा निर्णय त्वरित जारी करणे, शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सेवेत कार्यरत शिक्षकांना दिलासा देऊन अटी शिथिल करणे व त्यांच्यासाठी विशेष शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करणे, तसेच विशेष तपास पथकाच्या चौकशीत निर्दोष शिक्षकांना त्रास होऊ नये, अशा मागण्या मांडण्यात आल्या.
याशिवाय इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क माफ करणे, इयत्ता दहावी व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही अटीशिवाय परीक्षा शुल्कातून सूट देणे, पवित्र संकेतस्थळाद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा उपलब्ध करून देणे आणि चारशे पासष्ट रिक्त पदांचे खुल्या प्रवर्गात रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद, राज्य माध्यमिक विभागाचे अध्यक्ष इरफान अन्सारी, कार्याध्यक्ष शौकत महाते, राज्य प्राथमिक विभागाचे अध्यक्ष रिझवान चमन शेख, नबील सय्यद यांच्यासह संघाचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.