Ratnagiri News : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाहनाच्या ताफ्यावर शुक्रवारी चिपळूणमध्ये दगडफेक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर ही दगडफेक झाली आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये राणे आणि जाधव यांचे कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाला. यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांनी उच्छाद मांडला असल्याची टीका केली आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणेच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे कोकणात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव विरुद्ध राणे यांच्या वाद आता चिघळल्याचे पाहायला मिळत आहे.
जाधव यांनी राणे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर आक्रमक झालेले नीलेश राणे हे शुक्रवारी गुहागरमध्ये सभा घेणार होते. या सभेला जात असताना चिपळूणमध्ये नीलेश राणे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. त्यानंतर राणे आणि जाधव समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
यावरूनच आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रावर सडकून टीका केली आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील किंवा नीलेश राणे आणि नितेश राणे यांच्याकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत.
मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरही नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. ते संताप निर्माण करणारेच आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची भाषा ही सर्वसामान्य माणासला ची़ड आणणारी आहे. त्यामुळे या पिता-पुत्रांनी जो उच्छांद मांडला आहे, तो पाहता चिपळूनमध्ये झालेल्या हल्ला ही शिवसैनिकांची नैसर्गिक प्रतिक्रिया होती, अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून राणेंकडून पातळीसोडून वक्तव्ये केली जात आहेत. राणे पिता-पुत्रांकडून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये जाणीवपूर्वक केली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला आहे. यापुढे देखील राणे पिता-पुत्रांनी अशा भाषेचा वापर थांबवला नाहीतर आज जे गुहागरमध्ये झाले ते प्रत्येक तालुक्यात घडू शकते, असा अप्रत्यक्ष इशाराच सुषमा अंधारे यांनी राणे यांना दिला आहे.
दरम्यान, नीलेश राणे (Neelesh Rane) यांची गुहागरमध्ये सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. राणे म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आमच्यावर बोलण्याचा अधिकार फक्त ठाकरेंनाच आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी आता महाराष्ट्रात कुठेही सभा घ्यावी, त्या ठिकाणी हा नीलेश सभा घेणार हे लक्षात ठेवावे, या भास्कर जाधवचा बाजार नाही उठवला तर नीलेश राणे नाव सांगणार नाही, असे आव्हानच राणे यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना दिले आहे.'