Nashik Political News : नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाचे नाव पुढे येते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. भाजप नेते याबाबत उघड काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, आरएसएसच्या पठडीत तयार झालेला आणि भाजपशी वर्षानुवर्षे एकनिष्ट असलेल्या कार्यकर्त्यास संधी मिळेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे. भाजपची ही रणनीती पक्षाच्या इच्छुकांसह विरोधकांनाही शॉक देणारी ठरू शकते.
2019 मध्ये नाशिक लोकसभा (Nashik) मतदारसंघासाठी शिवसेना भाजप युती एकत्र लढली. त्यावेळी ही जागा भाजपने ताब्यात घेण्यासाठी बऱ्याच हालचाली केल्या होत्या. प्रत्यक्षात काही इच्छुकांना तयार सुद्धा केले होते. प्रत्यक्षात युती झाली अन ही जागा शिवसेनेला मिळाली. या संधीचे सोने करीत खासदार हेमंत गोडसे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहचले.
आता पक्षफुटीमुळे निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. खासदार गोडसे (Hemant Godse) शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहे. ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा शिवसेना करते. मात्र, प्रत्यक्षात तशी तयारी पक्षाकडून सुरू असल्याचे कोणतेही चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे २०१९ मध्ये हुकलेली संधी भाजप यंदा पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या गोटातून दिनकर पाटील, स्वामी विवेकानंद मिशनचे स्वामी कंठानंद यांच्यासह बरीच नावे चर्चेत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची माळ भाजप (BJP) कार्यकर्ते आणि उद्योजक अनिल जाधव यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. २०१९ मध्ये पक्षाने जाधव यांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते. मात्र, युती झाली आणि जाधव यांची संधी हुकली. ही हुकलेली संधी जाधव यांना भाजपचा ‘स्ट्रॉग कँडीटेड’ म्हणून पुढे आणू शकते.
याबाबत अनिल जाधव (Anil Jadhav) म्हणाले, मी ४० वर्षांपासून पक्षासोबत आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक उपक्रम राबवले. मात्र आजवर कधीही पक्षाकडे पदाची मागणी केली नाही. गत वेळी पक्षाने सांगितले म्हणून तयारी केली होती. यावेळी तशी संधी मिळू शकते. त्यामुळे तयारीत आहे. पक्षासाठी त्याग करणाऱ्यांचा सन्मान करण्याचे पक्षाचे नेहमीच धोरण राहिले आहे. राज्यसभा निवडणूक आणि त्यात नियुक्त करण्यात उमेदवार यांची नावे आपण पाहिलीत की ही बाब स्पष्ट होते, असे जाधव म्हणाले.
पक्षाबरोबर आमची बांधिलकी आहे. त्यामुळे पदे, उमेदवार मिळतील की नाही, याचा विचार मी करीत नाही. मात्र, संधी मिळाल्यास निवडणूक लढवेल. विकासाची योग्य कल्पना तयार असून, त्यावर आमचे कामही अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा दावा जाधव यांनी केला. दरम्यान, जाधव यांच्या एन्ट्रीमुळे भाजपकडून इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांसाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी काही जण नुकतेच पक्षात आले आहे. तर, काही जण नाशिकमध्ये नवीन आहेत. सध्या समोर असलेल्या उमेदवारांपैकी जाधव यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.