

Teacher Transfer Scam News: शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. तब्बल २६८ शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तीनशे जणांवर कारवाई होणार असल्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील भष्ट्राचार समोर आला आहे. यातील काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखल केले तर काहींनी परित्यक्ता असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन बदलीचा लाभ घेतला. तर काहींनी वास्तव्याच्या ठिकाणाचे अंतर चुकीचे दाखवून बदलीचा लाभ घेतला. या गैरव्यवहारात शिक्षण विभागासह आरोग्य विभागातील काही बडे अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते.
सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला आहे. त्यानंतर बदल्याचे हे धक्कादायक वास्तव बाहेर आले. याप्रकरणी प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या तीनशे जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शिक्षण विभागाकडून कार्यवाई सुरू असून अनेक प्रमाणपत्रावर आक्षेप घेतले आहेत.
दिव्यांग व्यक्तींचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणाऱ्या या शिक्षक, अधिकाऱ्यांवर काय कठोर कारवाई होणार याकडे शिक्षक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. गणेश कुरई यांनी या प्रकरणाची माहिती मागवल्यानंतर सुरवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यांना धमक्या देण्यात आल्या. आमदार हरिष पिंपळे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर चौकशीला वेग आला. या प्रकरणी विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या.
बदली प्रक्रिया करण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीची याबाबत अद्याप चौकशी झालेली नाही, या कंपनीकडे शिक्षकांनी जी प्रमाणपत्र दिली, ती कंपनीने तपासली नाहीत, तपासणीसाठी सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे हे प्रमाणपत्र पाठवली नाही, या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांनी आवाज का उठवला नाही, असा सवाल गणेश कुरई यांनी उपस्थित केला आहे. तपासात यातील अनेक बडे मासे गळाला लागतील, असे कुरई यांनी सांगितले.
"बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून योग्य त्या ठिकाणी बदली करून घेणे हे चुकीचेच आहे शिवाय जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावर देखील हा अन्याय आहे त्यामुळे संबंधितावर नियमानुसार योग्य ती कारवाई झाली पाहिजे"
शिवाजी खांडेकर, सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक, शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.