

Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या चर्चित 'ऑपरेशन टायगर'ने आता निर्णायक टप्पा गाठल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, याचे थेट पडसाद पुण्याच्या राजकीय वर्तुळात उमटले आहेत.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत पुण्यात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे संपूर्ण राज्यात 'ऑपरेशन टायगर' हे पूर्वनियोजित होत का, अशा चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी शहरात हे पोस्टर्स लावले आहेत.
या पोस्टर्सवर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यावर ठळक अक्षरात 'जस्ट वेट अँड वॉच' असा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, 'ऑपरेशन टायगर'ची पूर्ण तयारी झाली असल्याचे हि या बॅनरमधून सांगण्यात आले आहेत. त्यामुळे नाना भानगिरे यांना या संभाव्य मोठ्या फुटीबाबत आधीपासूनच नेमकी काय माहिती होती, आणि या ऑपरेशनची स्क्रिप्ट कधी आणि कुठे लिहिली गेली, असा सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
दुसरीकडे, या संभाव्य राजकीय वादळाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने थेट दिल्लीमध्ये आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटातील ९ पैकी तब्बल ६ खासदार मध्यरात्री अचानक वेगवेगळ्या मार्गांनी दिल्लीत दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासदार अत्यंत गुप्तपणे काही खासगी विमानाने तर काही विशेष विमानाने राजधानीत पोहोचले आहेत. या खासदारांच्या दिल्लीतील संशयास्पद हालचालींनंतर तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीत दाखल झाल्याने 'ऑपरेशन टायगर' आता अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्लीत पोहोचलेल्या या खासदारांची स्वतंत्र बैठक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या संपूर्ण घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमांवरून थेट आणि अतिशय टोकदार शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, "अपना सपना... मनी... मनी... महाराष्ट्रातील काही खासदारांना आज रात्री पक्षांतरासाठी प्रत्येकी तब्बल १५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. हा प्रकार धक्कादायक आणि संतापजनक आहे." असा आरोप राऊत यांनी केला आहे.
या सर्व कायदेशीर व राजकीय शक्यता लक्षात घेऊन ठाकरे गटाने आतापासूनच बचावात्मक आणि कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेतील पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक तातडीचे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभेत अधिकृत नेता आणि व्हिपच्या माध्यमातून एकसंध राजकीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यात यावी. पक्षातील कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा स्वतःला स्वतंत्र म्हणवणाऱ्या गटाला कुठलीही स्वतंत्र मान्यता, विशेषाधिकार किंवा संसदीय सुविधा देऊ नयेत. भविष्यात अशा प्रकारचा कोणताही दावा किंवा मागणी समोर आल्यास, सर्वप्रथम मूळ पक्षाला आपली बाजू मांडण्याची कायदेशीर संधी देण्यात यावी.
एकीकडे दिल्लीत खासदारांच्या गुप्त हालचाली आणि कायदेशीर लढाईची तयारी सुरू असताना, पुण्यात नाना भानगिरेंनी लावलेले 'जस्ट वेट अँड वॉच'चे बॅनर्स मुळे चर्चांना उधाण आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.