Tukaram Mundhe 11.41 crore illegal stock seized : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर औषधांच्या गुणवत्तेबाबत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाईला वेग दिला आहे. औषध माफिया, अनधिकृत औषध विक्री आणि नियमबाह्य साठ्याविरोधात FDAकडून राज्यभर तपासणी आणि छापेमारी सुरू आहे.
जून ते ऑगस्ट 2026 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत FDAने राज्यातील तब्बल 2902 औषध उत्पादन आणि विक्री ठिकाणांची तपासणी केली. या कारवाईत सुमारे 11.41 कोटी रुपयांचा अवैध औषधे आणि कॉस्मेटिक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.
FDAच्या माहितीनुसार, या कालावधीत औषध उत्पादन करणाऱ्या 607 आस्थापनांची, तर औषध विक्री करणाऱ्या 2295 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. म्हणजेच एकूण 2902 ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर उत्पादन आस्थापनांमधील 140 आणि विक्री आस्थापनांमधील 740 अशा एकूण 880 परवानाधारकांविरोधात नियामक कारवाई करण्यात आली.
याशिवाय FDAने 104 ठिकाणी तलाशी आणि जप्तीची कारवाई केली. या कारवाईत तब्बल 11.41 कोटी रुपयांचा अवैध औषधे आणि कॉस्मेटिक्सचा साठा जप्त करण्यात आला. गंभीर प्रकरणांमध्ये 20 FIR दाखल करण्यात आल्या असून 21 जणांना अटक करण्यात आली आहे.
FDAच्या तपासणीत काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आवश्यक नोंदणीशिवाय औषधांची विक्री होत असल्याचे आढळले. तसेच इंसुलिन आणि आवश्यक लसींसारख्या जीवनरक्षक औषधांसाठी आवश्यक असलेल्या तापमानाचे नियमही काही ठिकाणी पाळले जात नसल्याचे तपासणीत समोर आले. औषधांचा साठा आणि विक्रीच्या नोंदवहीतही अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे औषधांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करण्यावर FDAने भर दिला आहे.
औषधांची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक आणि विक्री यासंबंधीच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी FDAकडून केली जाते. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे मिळणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. FDA प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, औषधांची गुणवत्ता आणि नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधातील तपासणी आणि नियामक कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.