Maratha Reservation : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून भाजपची चांगली कोंडी केली. (Uddhav Thackeray News) १६ आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेले निर्देश आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार, खासदारांचे सुरू असलेले राजीनामा नाट्य यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर तो दिल्लीतूनच सोडवावा लागेल. (Shivsena) त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामे द्यावेत, त्यानंतरही प्रश्न सुटला नाही, तर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी आपले राजीनामे देऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांनाच राजीनामा देण्याचे आवाहन करत केंद्र आणि राज्यातील भाजपचा गेम केल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. (Maratha Reservation) दसरा मेळाव्याच्या भाषणातही ठाकरेंनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विशेष उल्लेख करत त्यांचे धन्यवाद मानले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे, तो जरांगे यांनी हाणून पाडल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांना साथ देण्याची ग्वाही दिली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतूनच सोडवावा लागेल, असेही सांगितले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यात पेटले असताना उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. शिंदे गटाचे जे आमदार मराठा आरक्षणासाठी म्हणून राजीनामे देत आहेत, त्यांना आपण अपात्र ठरणार आहोत हे माहीत असल्यामुळे ते राजीनामे देत असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री विशेष अधिवेशन घेऊन सोडवणार असतील, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमच्याशी चर्चा केली नाही तरी चालेल, पण आरक्षणाचा प्रश्न सोडवा. जसे विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला पंतप्रधानांना भाग पाडा. केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीत मोदींना सगळे विषय बाजूला ठेवून आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी केली पाहिजे.
तसे न झाल्यास सगळ्या मंत्र्यांनी आपले राजीनामे मोदींकडे दिले पाहिजे. तरच या विषयावर केंद्रातील सरकार काहीतरी हालचाल करेल. एवढे करूनही काही झाले नाही, तर मग महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आपले राजीनामे द्यावे. महाराष्ट्राची एकजूट काय असते हे केंद्रातील सत्ताधाऱ्यांना दाखवून द्या, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातून शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील, हेमंत गोडसे यांनी आपले राजीनामे दिले आहेत. तसेच मराठवाड्यातील शिंदे गट, भाजप, काँग्रेसच्याही काही आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपच्या मंत्र्यांनाच मराठा आरक्षणासाठी राजीनामे देण्याचे आवाहन करत त्यांची कोंडी केली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.