

Mumbai News : दिल्लीत संसदेचे अधिवेशन घडत असल्याने एकीकडे वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच सुप्रीम कोर्टात गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या सुनावणीला गेल्या आठवड्यापासून मुहूर्त लागला आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सहा खासदारांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याभेटीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार पीएम मोदी यांची सोमवारी भेट घेणार असल्याने वातावरण तापले आहे. आता यावरूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्याने सणसणीत वार केला आहे.
दोनच दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा बंडखोर खासदारांनी पीएम मोदी यांची भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार पंतप्रधान मोदी यांना सोमवारी भेटणार आहेत. यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. आता पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार आहेत. आता जर देशाची परिस्थिती बघितली तर कोणता घटक सुखी आहे. मोदींची भेट घेतल्यानंतर त्यात काय बदल होणार आहे? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या संदर्भात विचारले असता दानवे म्हणाले की, आपल्या देशातल्या भगिनींचे सिंदूर गोळ्या मारून हिसकावून नेले, त्याच्यासाठी हे सिंदूर ठेवतात का? एकनाथ शिंदे यांचा दिल्लीशी काय संबंध आहे? अमित शहा आणि मोदींचे पाय चेपणे एवढाच संबंध उरला आहे. बाकी काय संबंध शिंदेंचा दिल्लीशी असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.
येत्या काळात संसदेत मांडल्या जाणाऱ्या डीलिमिटेशन बिलाविषयी भाजपचा एवढा अट्टाहास का आहे हेच कळत नाही. महिला आरक्षणाचे बिल 2023 पासून मंजूर झाले आहे, पण ते अजून लागू झालेले नाही. भाजपकडून जनतेची दिशाभूल करत आहेत की विरोधक महिलांना विरोध करत आहेत. तुमचा मुख्य हेतू डीलिमिटेशन आहे. महिला आरक्षण नाही. काही भागातील खासदार वाढावे आणि काही भागातील कमी व्हावे, यासाठी भाजप प्रयत्नशील दिसत असल्याची टीका दानवे यांनी केली.
सीएम देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकत्र विमान प्रवास केला आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा पूर्ण नियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी एकत्रित प्रवास केला असेल. त्यात फार वावगे वाटत नाही.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.