
Latur News: पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी ओळखत नव्हते, त्यावेळेसपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेना जिंकत आहे. त्यामुळे भाजपकडून केवळ आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह दोघेही नेहमीच महाराष्ट्रात येत आहेत. दुसरीकडे मणिपूरला का जात नाहीत? असा सवाल विचारत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी व शुक्रवारी धाराशिव मतदारसंघाचा दौऱ्यावर आहेत. औसा येथे गुरुवारी दुपारी उद्धव ठाकरे यांची घणाघाती सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटलं तिथं जायची त्यांची हिंमत झाली नाही. सातत्याने ते महाराष्ट्रात येत आहेत. फणा काढत आहेत. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसलंय तिथे जात नाहीत. गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्याचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईल. पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.
मुख्यमंत्री नाहीत, पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतात असे ते म्हणाले. बरोबर आहे. मी मुख्यमंत्री नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्या असतात. माझ्या सभांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मी मुख्यमंत्री नाहीये हे मला माहीत आहे. उरणला संध्याकाळी सभा होती. त्या सभेत लोकांना थंडी वाजत होती. आज येथे घामाच्या धारा वाहत आहेत. थंडीतही गर्दी होती आणि लाही लाही करणाऱ्या उन्हातही गर्दी आहे. याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्र चवताळलेला आहे. निवडणुकीची वाट पाहत आहे, असे यावेळी बोलताना ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनता सध्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे राज्यातील जनता चवताळली आहे, निवडणूक कधी होणार याची वाट पाहत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना धाराशिवचा गड पुन्हा राखणार असल्याचे सांगत जनता आमच्या बाजूनेच उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
.
स्वत:च्या वडिलांचे फोटो लावून जिंका ?
उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालूच शकत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेना फोडली. बाळासाहेबांचे फोटो लावत आहेत. मी मिंध्यांना भाजपलाही आव्हान देतो, स्वत:च्या वडिलांचे फोटो लावून जिंका ना ? स्वत:च्या वडिलांवर आत्मविश्वास नाही का ? माझे वडील का चोरता ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी धाराशिव मुक्कामी असणार आहेत. तत्पूर्वी धाराशिव लोकसभेतील पाच मतदारसंघांत त्यांच्या सभा होणार आहेत. त्यांची गुरुवारी उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार वाजता सभा होणार आहे. सायंकाळी सात वाजता तुळजापूर येथील आंबेडकर चौकात सभा आयोजित करण्यात आली आहे. धाराशिव शहरात मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कळंबच्या मार्केट यार्ड मैदानावर सभा होईल. त्यानंतर परंडा येथे दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
R