जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आपण एकमेव विरोधक आहोत, त्यामुळे विरोध संपवून टाकण्यासाठी गुन्ह्यात अडकवून आपल्याला ऐनकेन प्रकारे अटक करण्याचे षडयंत्र सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला दिली आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांनी पत्रकारांशी बोलताना केला. (A conspiracy is being hatched to arrest me : Eknath Khadse)
दरम्यान, जामनेर येथील रहिवासी असलेल्या ‘एलसीबी’ (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) पोलिसाच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत आहे, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील लोणी व दूध भुकटी चोरीप्रकरणी संघाच्या चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या लेखी तक्रार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. कोणाचा तरी दबाव असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. याच दबावातून आपल्याला कोणत्याही गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे.
जामनेर येथील रहिवासी असलेल्या ‘एलसीबी’च्या (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) पोलिसाच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असून, त्यांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असल्याची माहिती मिळाली आहे, असेही खडसे यांनी सांगितले.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी (ता. १५ ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही खडसे यांना कारागृहात जावे लागणार आहे, असा आपल्याबाबत उल्लेख केला होता. त्यामुळे त्याच अनुषंगाने हे षडयंत्र असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याबाबत आपण माहिती घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन लावला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. आपल्याला अटक करून जिल्ह्यातील राजकीय विरोध संपविण्याची ही खेळी असल्याचे मतही खडसे यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.