एलबीटीच्या नावाखाली धुळे महापालिकेत खंडणी वसुली!

शिवसेना नेते मनोज मोरे यांनी खळबळजनक आरोप करीत दिला महापालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा.
Dhule Corporation Building
Dhule Corporation BuildingSarkarnama

धुळे : एलबीटीच्या (LBT) नावाखाली महापालिकेचे (Dhule Corporation) खंडणी वसुली केंद्र सुरू आहे, ते तत्काळ बंद करावे, अन्यथा शिवसेना या केंद्राला टाळे ठोकेल, असा इशारा शिवसेनेचे (Shivsena) महानगरप्रमुख मनोज मोरे (Manoj More) यांनी दिला आहे. ठेकेदार स्वतःची तुंबडी भरून महापालिकेचे आर्थिक नुकसान करीत असताना, सत्ताधारी मुकाट्याने सहन करत आहेत. त्यामुळे खंडणी वसुलीसाठी ठेकेदाराला सत्ताधाऱ्यांची मूक संमती आहे की काय, असा प्रश्‍नही श्री. मोरे यांनी उपस्थित केला आहे.

Dhule Corporation Building
केंद्र सरकार ठामपणे कांदा उत्पादकांच्या पाठींशी राहील!

एलबीटीच्या अनुषंगाने महापालिकेने व्यापाऱ्यांना त्रास देऊन खंडणी गोळा करण्यासाठी एका एजन्सीला ठेका दिला. एजन्सीच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांचा छळ केला जात आहे. व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली जात आहे. महापालिकेतील सत्ताधारी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असूनही व्यापाऱ्यांच्याच उरावर बसले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात सत्ताधाऱ्यांविषयी प्रचंड नाराजी असल्याचे श्री. मोरे यांनी म्हटले आहे.

Dhule Corporation Building
...आता शिवसेनाही राज्यपलांच्या विरोधात रस्त्यावर उतरली!

६३ लाखांची नोटीस

शालेय पुस्तके व ग्रंथ, धर्मग्रंथावर एलबीटी लागू नसताना शहरातील एका प्रतिष्ठित पुस्तकालयास तब्बल ६३ लाख रुपयांची नोटीस दिली व तडजोड करायची असेल, तर १७ लाख रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे. शेकडो व्यापाऱ्यांना लाखो रुपयांच्या नोटिसा पाठवून लाखांत तडजोड केल्याचीही चर्चा आहे. सोने-चांदी, कापड, धान्य व्यापाऱ्यांना विशेष टार्गेट केले जात आहे. टेबला खालून लाखो रुपये घ्यायचे व शासनाची हजारांत पावती फाडून तडजोड करायची यातून ठेकेदार स्वतःच्या तुंबड्या भरून महापालिकेचे मात्र आर्थिक नुकसान करीत असल्याचा आरोप श्री. मोरे यांनी केला आहे. पहिल्यांदा निवडून आलेल्या काही नगरसेवकांकडून शहरातील जनतेला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांची ‘हाताची घडी-तोंडावर बोट’, अशी अवस्था आहे. त्यामुळे कर्तृत्वान असूनही त्यांच्यावर निष्क्रियतेचा शिक्का लागत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

दालनाला टाळे ठोकू

प्रशासनाने व्यापाऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अन्यथा शिवसेना या प्रकरणात हात घालेल व शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडून प्रशासनासह ठेकेदाराला पळता भुई थोडी करेल. अधिकारी, ठेकेदाराच्या दालनाला टाळे ठोकून कोंडले जाईल, असा इशारा देत एलबीटी वसुली ठेकेदाराकडून त्रास होत असल्यास संबंधित व्यापाऱ्यांनी शिवसेनेच्या प्रबोधनकार ठाकरे संकुलातील मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मोरे यांनी केले आहे.

समस्या‍ आता हातघाईवर

एलबीटी वसुलीच्या अनुषंगाने सत्ताधारी भाजपचे दोन नगरसेवक, एका नगरसेविकेचा पती व ठेकेदार यांच्यात महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात जोरदार वादावादी झाल्याची एवढेच नव्हे, तर या वादात नगरसेविका पतीने ठेकेदाराला मारल्याचीही चर्चा आहे. हाच संदर्भ घेऊन श्री. मोरे यांनी हे चांगले लक्षण असल्याचे म्हणत व्यापारी वर्ग खूश असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एलबीटी वसुलीच्या अनुषंगाने सत्ताधारी काही नगरसेवकांनीही यापूर्वी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, यातून काहीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. परिणामी, हा प्रश्‍न आता हातघाईवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com