

Ahilyanagar DCCB Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधींचे ठराव दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. ठराव प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी राजकीय चुरस पाहायला मिळाली.
विशेषतः पारनेर तालुक्यात ठरावावरून संचालकांच्या कथित अपहरणाच्या आरोपांमुळे हा विषय चर्चेत राहिला. काही नव्या इच्छुकांनाही सहकार क्षेत्रात स्थान मिळवण्यासाठी राजकीय संघर्षाचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसले.
यंदाच्या प्रक्रियेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नावाने कर्जत आणि जामखेड तालुक्यांतील विकास सोसायट्यांनी ठराव केले आहेत. प्रा. शिंदे प्रथमच जिल्हा सहकारी (Cooperative) बँकेच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांच्या नावाने पारनेर तालुक्यातून ठराव करण्यात आला आहे.
संगमनेर (Samgamner) तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाने जोर्वे विकास सोसायटी तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ठराव केला आहे. यावरून संगमनेरमधील सहकार आणि स्थानिक राजकारणातील त्यांचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येते.
यंदाच्या ठराव प्रक्रियेत अनेक विद्यमान आणि माजी आमदारांच्या नावाने ठराव झाल्याने स्थानिक पातळीवरील त्यांचे राजकीय अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे संचालक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत अनेक तालुक्यांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.
कोपरगावात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अशुतोष काळे यांच्या नावाने ठराव करण्यात आला आहे. भाजपचे विधान परिषद आमदार विवेक कोल्हे यांच्या नावानेही ठराव झाला असून, दोन्ही नेते यापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्व करत होते. अकोले तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड आणि मधुकर नवले यांच्या नावाने ठराव झाले आहेत.
नेवासामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी सभापती सुनीता गडाख यांच्या नावाने ठराव झाले असून, शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांच्या समर्थकांच्या नावानेही ठराव करण्यात आले आहेत. श्रीरामपूरमध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्ष करण ससाणे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांच्या नावाने ठराव झाले आहेत.
नगर तालुक्यात भाजपचे आमदार अक्षय कर्डिले, प्रताप शेळके, माधव लामखडे आणि काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या नावाने ठराव करण्यात आले आहेत. शेवगावात माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, राजश्री घुले तसेच भाजप समर्थकांच्या नावाने ठराव झाले आहेत. श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप, प्रतापसिंह पाचपुते, दत्ता पानसरे आणि बाळासाहेब नाहाटा यांच्या नावाने ठराव करण्यात आले आहेत.
कर्जतमध्ये प्रा. राम शिंदे यांच्यासह मंजुषा गुंड, सुनंदा पिसाळ, काकासाहेब तापकिर आणि सुरेश साळुंके यांच्या नावाने ठराव झाले आहेत. पाथर्डीत भाजप आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, अर्जुन शिरसाट, काशिनाथ लवांडे आणि संभाजी वाघ यांच्या नावाने ठराव करण्यात आले आहेत. जामखेडमध्ये प्रा. राम शिंदे आणि माजी संचालक अमोल राळेभात यांच्या नावाने ठराव झाले आहेत.
पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, गीतांजली शेळके, माजी आमदार नंदकुमार झावरे, सबाजी गायकवाड आणि सुजित झावरे यांच्या नावाने ठराव झाले असून, सर्वाधिक ठराव या तालुक्यात झाल्याची माहिती आहे. राहाता तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांच्या नावाने ठराव झाले असून, अंतिम उमेदवारीबाबत उत्सुकता आहे. राहुरीत भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे आणि उषा प्रसाद तनपुरे यांच्या नावाने ठराव करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.