

Farmer Relief Maharashtra : अहिल्यानगर जिल्हा सहकार आणि राजकारणात आघाडीवर आहे. मंत्री आणि नेते राजकीय कुरबोडी आणि आरोप प्रत्यारोपण व्यस्त आहे. मात्र शेतकरी दुष्काळाने त्रस्त आहेत.
नाशिक विभागाची कृषी आढावा बैठक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रक्षाताई खडसे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, मेघनाताई बोर्डीकर, राधाकृष्ण विखे पाटील आदी मंत्री उपस्थित होते. यावेळी आमदारांनी दुष्काळाची विदारक स्थिती मांडली.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनण्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी यावेळी मांडले. सध्या परिसरात सलग सुमारे 40 दिवसांचा पावसाचा खंड पडला असून, त्यामुळे पिकांवर गंभीर परिणाम होत असल्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाचा दिवस निश्चित करण्यासाठी सध्या असलेल्या 2.5 मिलिमीटर पावसाच्या निकषाऐवजी 5 मिलिमीटरचा निकष लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
महसूल मंडळांचे क्षेत्र मोठे असल्याने मंडळनिहाय पावसाची आकडेवारी अनेकदा गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचे वास्तव चित्र दर्शवत नाही. शासनाकडे (Government) गावनिहाय आकडेवारी उपलब्ध असल्याने दुष्काळ व मदतीसंदर्भातील निर्णय घेताना गावनिहाय आकडेवारीच ग्राह्य धरण्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीक विम्याच्या निकषांबाबतही आ. कोल्हे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सध्या उपग्रह आधारित व्हेजिटेटिव्ह इंडेक्स आणि प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग या दोन्ही निकषांचा वापर केला जातो. मात्र उपग्रह चित्रात पीक हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाचा निकष ग्राह्य धरावा आणि पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.कालव्याच्या आवर्तनाची शाश्वती नसल्याने शेतीसाठी आवर्तनाची खात्री तसेच पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता करून देण्याची मागणी त्यांनी ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली.
महावितरणकडून शेतीसाठी होणारा अपुरा वीजपुरवठा हा अत्यंत गंभीर प्रश्न असून त्यावर तातडीने विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करताना फळबाग सोसायट्यांचे सभासद शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच ई-पीक पाहणीची अट शिथिल करून शेतकऱ्यांना सूट देण्याची मागणी केली. कोपरगाव तालुक्यात केवळ 40 ते 42 टक्के, तर अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 26 टक्के ई-पीक पाहणी झाल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.