

Maharashtra Temple Scam : अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शनैश्वर देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहार (अॅप घोटाळा) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निर्णय घेण्यापूर्वी याचिकाकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांना वैयक्तिक सुनावणीची संधी देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या आदेशानंतर कथित गैरव्यवहाराच्या चौकशीबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे संबंधितांसह भाविकांचे लक्ष लागले आहे.
सोनई (ता. नेवासा) येथील सचिन प्रभाकर दरंदले यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनात शनैश्वर देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहार, बनावट पूजा, बनावट पावती पुस्तके, क्यूआर कोडद्वारे होणाऱ्या व्यवहारातील कथित अनियमितता, अतिरिक्त कर्मचारी भरती तसेच मागील दहा वर्षांतील आर्थिक व्यवहारांची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी आणि स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, या निवेदनावर कोणताही निर्णय न झाल्याचा दावा करत दरंदले यांनी अॅड. उमाकांत वाघ यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या (Court) औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.
न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर राज्य सरकारला याचिकेतील निवेदनावर आठ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, निर्णय घेण्यापूर्वी याचिकाकर्त्यांना वैयक्तिक सुनावणीची संधी देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी जमा केलेली पाच लाख रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर नियमानुसार निर्णय घ्यावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. उमाकांत वाघ यांनी बाजू मांडली, तर राज्य सरकारतर्फे सरकारी वकील एन. एस. टेकाळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.