

BJP NCP alliance Shrirampur : अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या नगरपरिषद निवडणुकीत अखेर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अखेरच्या क्षणी युतीची घोषणा झाली. राष्ट्रवादीसाठी 12, तर भाजपसाठी 22 जागांची फॉर्म्युला निश्चित करत, जागा वाटणी झाली.
यानंतर दोन्ही पक्षांनी लढत संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय पक्का केला. अध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीपासून दूर ठेवण्यात आलं. श्रीरामपूर नगरपरिषदेत भाजप-एनसीपीविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेन पक्षात सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालं.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील राजकीय वातावरण एकाच वेळी तणावपूर्ण आणि उत्सुकतेने भरलेले दिसलं. एबी फॉर्मच्या वितरणावरून पक्षांमध्ये धावपळ सुरू होती. प्रभागांत पक्षबदलाची लगबग, एबी फॉर्मवरून नवा कलाटणीबाजार अनुभवायला येत होता. श्रीरामपूरमधील निवडणूक सरळसरळ बहुरंगी आणि अत्यंत स्पर्धात्मक बनली आहे.
प्रभाग 15मध्ये मोठा राजकीय तडाखा बसला. आठ दिवस शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारीवर प्रचार केलेले संजय छल्लारे यांनी अचानक भाजपची वाट धरत कमळाचे चिन्ह हातात घेतले. या बदलामुळे प्रभाग 15 मधील समीकरणे पूर्णपणे बदलली. एकनाथ शिंदे शिवसेनेतही ‘शेवटच्या क्षणात तिकीट’ मिळवणाऱ्यांचा तांडा दिसला. इतर पक्षात तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांना त्यांनी अंतिम क्षणी एबी फॉर्म देत उमेदवारी निश्चित केली.
काँग्रेसच्या करण ससाणे गटाने मात्र सुरुवातीपासूनच उमेदवारी यादी निश्चित केल्याने त्यांच्या छावणीत कोणताही गोंधळ दिसला नाही. त्यांचे उमेदवार निर्धास्तपणे अर्ज दाखल करताना दिसले. भाजप–राष्ट्रवादी युतीची घोषणा उशिरा झाल्याने दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुकांना शेवटच्या क्षणी निर्णय समजला. मुस्लिमबहुल प्रभागांसह 12 जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या. काही अनुभवी इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने ते थेट इतर पक्षांकडे वळल्याचेही दिसले.
माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रभाग ३ मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरत अध्यक्षपदाच्या चर्चेतून स्वतःला दूर केल्याचे स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश चित्ते आणि दिपाली चित्ते या दोघांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सुनेने आणि सागर बेग समर्थकांना नऊ एबी फॉर्म देत शिवसेनेने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत विक्रमी मताधिक्य मिळवणारे बेग यांनी मात्र नगराध्यक्ष पदाची राजकीय पुनरावृत्ती टाळत बाजू घेतली.
रविवारी रात्रीपासून दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या बैठका आज सकाळी निर्णायक ठरल्या. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी नगराध्यक्ष संजय फंड आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या मॅरेथाॅन बैठका सुरू होत्या. शेवटच्या बैठकीत भाजप-एनसीपीमध्ये 22–12 चा फॉर्म्युला मंजूर झाल्यानंतर इच्छुकांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली.
युती जाहीर होताच, डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे शिवसेना सतत भूमिका बदलत असल्याने आम्ही त्यांच्यापासून दूर राहिलो. श्रीरामपूरला विकासाचा ठोस चेहरा हवा आहे. इथं प्रत्येक निवडणुकीत जातीय गणिते लावली गेली. पण आमचा त्यावर विश्वास नाही. 40 वर्षांत काही करू शकले नाहीत ते आता उमेदवार होऊन काय करणार?” असा सवाल त्यांनी प्रकाश चित्ते यांचे नाव न घेता उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक म्हणाले, “पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत चर्चेनंतर भाजप–राष्ट्रवादी युती अधिकृत केली आहे. शिवसेना या युतीपासून दूर आहे. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.