Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरली. विखे पाटलांच्या सत्तेला शरद पवारांनी सुरूंग लावला आहे. 1991 मध्ये पवारांनी सुजय विखेंच्या आजोबांचा पराभव केला होता. त्यानंतर तब्बल 33 वर्षांनंतर पवारांनी संधीचं सोनं करत विखेंना अद्दल घडवल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
निलेश लंकेंनी सुजय विखेंचा पराभव केला आहे. ईव्हीएम मशीनवर सुजय विखे आणि निलेश लंके यांचे नाव होते. पण खरी लढत झाली ती विखे विरुध्द पवार अशीच. ही निवडणूक विखेंना तितकीशी सोपी असणार नाही, हे लंकेंच्या उमेदवारीनंतरच स्पष्ट झाले होते.
शरद पवारांसह त्यांच्या सर्वच शिलेदारांनी मतदारसंघ पिंजून काढला. त्यांना माजी मंत्री व विखेंचे दुसरे राजकीय वैरी बाळासाहेब थोरात यांनीही खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे लंकेंचा विजय सुकर झाला. मागील काही निवडणुकांपासून पवारांकडून विखेंच्या पराभवासाठी राजकीय डाव टाकले, पण त्यात यश मिळत नव्हते.
1991 च्या निवडणुकीत पवारांनी बाळासाहेब विखे यांच्याविरोधात रान उठवलं होतं. एकमेकांवर जोरदार चिखलफेक करण्यात आली. पण या निवडणुकीत पवारांनी यशवंतराव गडाखांना निवडून आणलेच. तशीच लढत यावेळी झाली.
काय घडलं होतं 1991 मध्ये?
1991 च्या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. यशवंतराव गडाख यांना तिकीट मिळालं होतं. त्यानंतर राजीव गांधींनी शरद पवारांवर त्यांना पराभूत करण्याची जबाबदारी सोपवली. गडाख यांना निवडून आणल्यानंतर मात्र विखे पाटलांनी हायकोर्टात धाव घेतली.
विखे पाटलांनी पवारांना चांगलंच अडचणीत आणले आणि खटलाही जिंकला. कोर्टाने गडाखांची निवड रद्द करून त्यांच्यावर सहा वर्षांची बंदी घातली. तसेच विखे पाटलांना विजयी घोषित केले. या निकालाविरोधात गडाखांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टाने हायकोर्टाचा निकाल रद्द ठरवला. मात्र, गडाखांची निवडही अवैध ठरवली. शिवाय पवारांना बजावलेली नोटीसही रद्द केली होती. तेव्हापासून राजकारणात विखे विरुध्द पवार असा सामना सुरू झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.