Ahmednagar Politics: मोठी बातमी! नगरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; काँग्रेसच्या नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार

Kiran Kale: या तक्रारीमुळे महापालिका प्रशासनासह नगर शहरातील राजकारणात खळबळ
Ahmednagar Congress
Ahmednagar CongressSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: नगर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. याला राजकीय वरदहस्तातून महापालिका अधिकारी, ठेकेदारांच्या संगनमताने झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

किरण काळे यांनी 776 रस्त्यांच्या कामात नगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे गुणवत्ता चाचणी अहवाल, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यासाठी तंत्रनिकेतन, राजपत्रित अधिकारी यांच्या नावे बनावट शिक्के, लेटरहेड तयार करून रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील व नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. किरण काळे यांच्या या तक्रारीमुळे महापालिका प्रशासनासह नगर शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

किरण काळे यांनी काँग्रेसच्या शिवनेरी संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. किरण काळेंनी पुराव्यांची कागदपत्रे पत्रकार परिषदेत मांडली. काळेंनी लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीत विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह 2016 ते 2023 मधील आठ आयुक्त आणि सहा शहर अभियंता, बांधकाम विभागाचा चार्ज असणारे सात वर्षांतील सर्व उपायुक्त, बांधकाम, लेखा विभागातील कर्मचारी, ठेकेदार, त्यांच्या संस्थांचे प्रोप्रायटर, भागीदार, ऑडिटर, नगरमधील शासकीय तंत्रनिकेतन तसेच शासकीय, निमशासकीय संस्था यांनी बनावट गुणवत्ता चाचणी अहवाल दिलेल्या त्या प्रक्रियेशी निगडित सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध सामूहिक संगनमत करत कट कारस्थान रचून रस्त्यांच्या कामात सरकार आणि जनतेची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.

Ahmednagar Congress
Nagar Politics : शिंदेंचे खासदार सदाशिव लोखंडेंचा संताप, आता थेट गडकरींकडेच करणार तक्रार

निकृष्ट दर्जाची कामे करून नगर शहराला खड्ड्यात घालणाऱ्या दोषींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम सात आणि 13 तसेच भारतीय दंड संहिता कलम 420, 467,468, 471, 466, 120 (ब), 196, 201, 202, 204, 475, 476, 477(अ) (34) अन्वये जनहितार्थ अति जलद फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या घोटाळ्यातील सहभागी असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्ती, जंगम, स्थावर मालमत्तेची चौकशी करावी, अपहारातील सहभागींची खुली चौकशी व्हावी, गैर मार्गाने मिळवलेल्या बेहिशेबी संपत्तीचा शोध घेऊन ती तत्काळ जप्त करावी, असेही काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काळेंच्या तक्रार आणि शासकीय तंत्रनिकेतन समोर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर प्राचार्यांनी 16 जूनला आदेश काढत 2016 ते 2020 कालावधीतील अहवालांची सत्यासत्यता पडताळणीसाठी पाच जणांची चौकशी समिती गठीत केली होती. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुखांना समिती प्रमुख करत विद्युत, यंत्र अभियांत्रिकी विभाग, प्रबंधक यांचा समावेश होता.

समितीने अहवाल सादर केला आहे. सदरहू चौकशी अहवालामध्ये नगर महापालिकेकडून प्राप्त 879 चाचणी अहवाल व त्रस्त चाचणी अहवालांपैकी 725 चाचणी व 51 त्रयस्थ परीक्षण अहवाल, असे एकूण 776 अहवाल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतून देण्यातच आलेले नसल्याची धक्कादायक बाब निष्पन्न झाल्याचे किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी खोटे गुन्हे

काँग्रेसने शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून अनेक निवेदने दिली. आंदोलने केली. मुंबईच्या आझाद मैदानावर खड्ड्यांचे प्रदर्शन भरवले. आत्मदहनाचा इशारा दिला. महापालिकेवर आसूड मोर्चा काढला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचार दडपण्यासाठी राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले गेले. रस्त्याचा मलिदा खाणारे चोर मोकाट फिरत आहेत. मात्र, रस्त्यांसाठी मोर्चा काढला म्हणून माझ्यासह काँग्रेस एक वर्षापासून न्यायालयात खेटा मारत आहेत. नगरकरांसाठी असे शंभर खोटे गुन्हे अंगावर घेण्याची तयारी असल्याचे किरण काळे यांनी या वेळी सांगितले.

'विश्वास नांगरेंना पुरावे देणार'

लाचलुचपत विभागाचे महासंचालक विश्वास नांगरे पाटलांची भेट घेणार असून, त्यांना हे सर्व पुरावे सादर करणार आहे. 1 डिसेंबरला नांगरे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेणार असून, याबाबत जलदगतीने सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले. नाशिक परिक्षेत्र पोलिस अधीक्षक धाडगे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाले असून, लवकरच नाशिक कार्यालयात समक्ष हजर राहून शेकडो कागदपत्रांचे पुरावे तपास कामी दाखल करणार असल्याचे काळे म्हणाले.

Ahmednagar Congress
Congress News: महापालिकेच्या व्यावसायिक परवाना शुल्कविरोधात काँग्रेस आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

मोठा राजकीय दबाव

किरण काळे यांनी महापालिका आयुक्त, शासकीय तंत्रनिकेतनकडे अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊन ही जाणीवपूर्वक घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तंत्रनिकेतनने पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. कोतवाली पोलिस ठाण्यातदेखील पत्र दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना मनपाकडे उपलब्ध असणारे बनावट कागदपत्रांचे पुरावे दाखल करायला सांगितले.

तसे तंत्रनिकेतनने महापालिका आयुक्तांना लेखी कळवले. मात्र, ते उपलब्ध करून दिले नाही. स्वतःही गुन्हा दाखल केला नाही. आयुक्त स्वतः याच्यामध्ये संगनमताने सहभागी असून, अन्य अधिकारी, ठेकेदारांना वाचण्यासाठी महापालिका सत्तेचा रिमोट कंट्रोल ज्याच्या हाती आहे, अशा शहरातल्या बड्या नेत्याचा त्यांच्यावर दबाव असल्याचा दावा किरण काळेंनी केला आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Ahmednagar Congress
Nana Patole : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने तातडीने मदत देण्याची पटोलेंची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com