Nashik Politics : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची सर्वाधिक ताकद नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिकमध्ये अजितदादांचे तब्बल सात आमदार आहेत. त्यातील तीन तर कॅबिनेट मंत्री आहेत. पण यातील दोन हेवीवेट मंत्र्यांच्या मागे जणू साडेसातीच लागली आहे. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावर दादांच्या राष्ट्रवादी बॅकफूटवर आली आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. ऐन नगरपालिका निवडणुकांच्यावेळीच ते आजारी पडले, त्यामुळे त्यांना प्रचारात भाग घेता आला नाही. अन् आता दुसरीकडे अॅड. माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळ्यात अडकले असून त्यांच्यावर अटकेसह अपात्रतेची टांगती तलवार आहे.
कोकाटे यांच्या नावे नाशिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. परंतु ते आता आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल झाले असल्याने त्यांना तुर्तास अभय मिळाले आहे. परंतु उच्च न्यायालयात कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर त्यांची जेलवारी निश्चित आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपला विश्वासू व लाडका शिलेदार गमवावा लागेल.
पुढे महापालिका व जिल्हापरिषदांच्या निवडणुका आहे. मंत्री छगन भुजबळ व माणिकराव कोकाटे दोघांचेही या निवडणुकांमध्ये सक्रीय राहणे महत्वाचे आहे. पण भुजबळांच्या मागे आजारपणाचे व कोकाटेंच्या मागे कोर्ट कचेरीचे ग्रहण लागल्याने राष्ट्रवादीचा नाशिकचा गड संकटात सापडला आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ आणि क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे या तिघांना अजित पवार यांनी मंत्रिपदाची संधी दिली. सुरुवातीला भुजबळांना डावलून माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी संधी दिली होती. तेही कृषी खात्यासारखे महत्वाचे खाते दिले होते. पण ते म्हणतात ना दैव देते अन् कर्म नेते अशी गत कोकाटेंची झाली. कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य, सभागृहात खेळलेला कथित रमी गेम यामुळे त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले. त्या बदल्यात त्यांना क्रीडाखाते देण्यात आले. आता सदनिका घोटाळ्यात त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी सुद्धा जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीची नाशिकच्या ग्रामीण भागात मोठी ताकद आहे. भुजबळ व कोकाटे दोन्ही नेत्यांचा येथील राजकारणावर मोठा प्रभाव आहे. मात्र हे दोघेही शिलेदार संकटात असल्याने नाशिकचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी अजित पवारांना आता अधिक धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका आणि पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाशिकचा गड राखणे राष्ट्रवादीला अवघड होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.