

Nashik News : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामती येथे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. दादांच्या निधनाला एक आठवडा उलटून गेला असला तरीही महाराष्ट्र अजूनही शोकाकुल आहे. अनेक ठिकाणी शोकसभा आयोजित केल्या जात असून अस्थींचे विसर्जन केले जात आहे. सामान्य कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी सगळेच दादांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.
'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' ही बहुचर्चित मोहीम राबविणारे नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा एक व्हिडीओ गेल्या तीन दिवसांपासून व्हायरल होतो आहे. नाशिकमध्ये २ फेब्रुवारी महाकवी कालिदास कलामंदिर या ठिकाणी आयोजित शोकसभेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणाचा तो व्हिडीओ आहे.
कर्णिक यांनी अजित पवारांबद्दलच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाले, आपले हक्काचे, आपले आधार आणि आपल्यावर खूप प्रेम करणारे अजित पवार. आम्ही सर्व्हिसमध्ये आलो तेव्हा दादा खूप मोठे होते, ते उपमुख्यमंत्री होते. पण सुरुवातीच्या काही वर्षातच आणि पहिल्या भेटीतच एका लहान भावाप्रमाणे त्यांनी आम्हाला जवळ घेतलं. माझा मोठा भाऊ आता माझ्या मागे नाही राहिला असं संदीप कर्णिक म्हणाले.
संदीप कर्णिक पुढे म्हणाले, अजितदादांचे मला फोन यायचे. इकडे अनेकजण बसले आहेत. समोर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माजी मंत्री व आमदार माणिकराव कोकाटे व देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्याविषयी त्यांनी उल्लेख केला. संदीप कर्णिक म्हणाले, मला अजित पवारांचे फोन यायचे. माणिकरावजी तुम्हीही इथे आहात. मागे एक विषय होता, त्याबाबतीत त्यांनी मला दरडावून सांगितलं होतं की 'तुम्ही स्वत: त्यात लक्ष घालायचं आहे. कुठलाही काही प्रॉब्लेम नाही झाला पाहीजे.
संदीप कर्णिक पुढे म्हणाले, मी पहिल्यांदा नाशिकमध्ये जेव्हा रुजू झालो. तेव्हा अजितदादानी मला ठणकावून सांगितलं होतं की 'सरोज माझी लहान बहीण आहे, तिची काळजी घ्यायची, अशी माहिती संदीप कर्णिक यांनी दिली. अशाप्रकारे अजित पवार आपल्या आमदारांची काळजी घ्यायचे.
कदाचित अजित पवारांनी कधी जाहीरपणे हे दाखवलं नसेल. पण ज्याप्रकारे त्यांचे फोन मला यायचे, ते पाहाता त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असायची, ते सगळ्यांची काळजी घ्यायचे. आपल्याप्रमाणेच मला देखील अजित पवार यांच्या जाण्याने पोरकं झाल्यासारखी भावना आहे अशा शब्दात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.