
Nashik politics News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन यांनी खास आपल्या जवळचे व मर्जितले असल्याने आयुष प्रसाद यांना नाशिकमध्ये आणल्याच्या मधुर चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे त्यासंदर्भात स्वत: आयुष प्रसाद याचं मत जाणून घेण्यासाठी यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता आयुष प्रसाद यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं.
आयुष प्रसाद म्हणाले, मी जेथे जातो तेथील नेत्याशी माझे नाव जोडले जाते. पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझे नाव जोडले गेले. पण, मंत्री महाजन हे तुम्ही एकनाथ खडसे यांच्या जवळचे असल्याचे म्हणतात. परंतु मी कोणाचाही नाही, असे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना आयुष प्रसाद म्हणाले, कदाचित नाशिकमधून जाताना देखील कोणच्या तरी नावासोबत माझे नाव जोडले जाऊ शकते, अशी टिप्पणी त्यांनी केली. दरम्यान आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. गतिमान आणि पारदर्शी कारभार ठेवावा. वेळेत सर्व कामे मार्गी लावावीत. ई- ऑफिसचा वापर करावा. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भू-संपादन व अन्य बाबींच्या पूर्ततेला प्राधान्य देताना लोकसहभागातून सुरक्षित व उत्कृष्ट कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनासह जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, तसेच प्रकल्पांसाठी यंत्रणा कार्यतत्पर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुष प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव (जि. पुणे) येथे आदिवासी विकास विभाागाचे प्रकल्प अधिकारी, अकोला आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.