Political News: उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.2) नंदुरबार दौऱ्यावर आले होते. अजित पवार यांचा हा दौरा नंदुरबार जिल्ह्यातील अजित पवार गटासाठी खास ठरला. पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते रतन पाडवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. तर, आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधकांना ताकद देत अजित पवार गट अधिक बळकट करण्याचे काम या दौऱ्यात अजित पवारांनी केले. त्यामुळे अजित पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. (Ajit pawar visit Nandurbar)
नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणावर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचे एक खांबी नेतृत्व आहे. जिल्ह्यातील बहुतांशी राजकीय संस्थांवर त्यांचे कुटुंबीय सत्तेत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी एकाकी झुंज देत होते. नंदुरबारच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार गावित यांच्याकडून काढून घेऊन अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आला. त्यामुळे रघुवंशी यांचा उत्साह वाढलेला आहे. आता मंत्री गावित यांच्या विरोधकांना आणि रघुवंशी यांनाही अधिक बळ मिळाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री पवार यांचा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. यावेळी धडगाव, तळोदा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी यावेळी या मतदारसंघातील उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटाला महायुतीकडे जागा मागण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. मोरे, मोहन शेवाळे, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, निखिल लुकानिया, ज्ञानेश्वर भामरे, किरण शिंदे, सिताराम पावरा, रतन पडवी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी खूप परिश्रम घ्यावे. सर्व समाज घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यातून निश्चितच चांगले काम उभे राहील. मोदी यांचा रस्ता अडविण्यासाठी विरोधक जंग जंग पछाडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या फुग्यात पाणी गेले आहे. त्यामुळे त्यांना फारसे काही करता येणार नाही. मात्र तरीही आपण गाफील राहू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पवार पहिल्यांदाच नंदुरबारच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यामुळे त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत झाले. जेसीबीतून फुले उधळण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी होती. त्यामुळे अजित पवार यांचा दौरा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते व मंत्री गावित यांना राजकीय इशारा देण्यासाठी तर नव्हता ना, अशी चर्चा रंगली आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.