

Akole heavy rain disrupts : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुसळधार वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे भंडारदरा, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि पाचपट्टा परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
काही मार्गांवर वाहनांची रांग लागल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिक अडकून पडले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपत्कालीन यंत्रणेची प्रतीक्षा न करता घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू केले.
राष्ट्रवादीचे (NCP) आमदार डाॅ. लहामटे यांनी काही झाडे हाताने बाजूला करण्यात आली, तर मोठी झाडे कुऱ्हाडीच्या साहाय्याने तोडून मार्ग मोकळा करण्यात आला. त्यांच्या या उपक्रमात स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेतला. त्यानंतर शासकीय यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली आणि संयुक्तपणे झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
अकोले (Akole) तालुका हा निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, पावसाळ्यात (Heavy Rain) येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आलेले काही पर्यटक मात्र परिसरात अडकून पडल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नागरिक आणि पर्यटकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर झाडे पडल्यास सुरक्षिततेची काळजी घेत प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच शक्य असल्यास स्थानिकांनी मार्ग मोकळा करण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील सुमारे 90 टक्के पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी प्रवरा नदीपात्रात नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
गेल्या 24 तासांत घाटघर परिसरात 300 मिमी, तर रतनवाडी येथे 248 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्यांतील धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असून, जोरदार वारे आणि सततच्या पावसामुळे पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील छोट्या पुलाजवळ पाणी पोहोचले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.