Apurva Hire News : भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार डॉ अपूर्व हिरे आणि अद्वय हिरे यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेच्या काही शाळांवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या हिरे यांना राजकीय धक्का बसला आहे. यातून आता नवा वाद उभा राहिला आहे.
या निर्णयाचा अप्रत्यक्ष संबंध शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री आणि हिरे यांचे कट्टर विरोधक दादा भुसे यांच्याशी जोडला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण मंत्री दादा भुसे आणि हिरे बंधू यांच्यात राजकीय वाद टोकाला पोहोचला आहे. यातूनच अद्वय हिरे यांच्याविरोधात खटल्यांचा ससेमीरा सुरू होता.
शिक्षण संचालकांच्या या निर्णयावर संस्थेचे संचालक माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिक्षण संचालकांकडे यासंदर्भात सुनावणी सुरू होती. त्याविषयी संस्थेच्या वतीने परिपूर्ण माहिती आणि खुलासा सादर करण्यात आला. अद्यापही काही शाळांविषयी सुनावणी सुरू आहे.
राज्याच्या शिक्षण संचालकांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या 28 शाळांवर प्रशासक नेमल्याची बातमी आली होती. जिल्ह्यात सर्वाधिक शाळा असलेली ही संस्था आहे. माजी मंत्री प्रशांत हिरे या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. दाभाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिस्पर्धी शिक्षण मंत्री भुसे यांचा या निर्णयाशी संबंध जोडला जात आहे.
निर्णयावर माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची आहे. त्यात वास्तव स्थिती आणि दिलेली कारणे पुरेशी नाहीत.
संस्थेच्या तीन शाळांना याबाबतच्या आदेशाची पत्र प्राप्त झाली आहेत. त्या विरोधात संस्था न्यायालयात दाद मागणार आहे. अशा प्रकारची कारवाई शिक्षण विभागाने करणे अभिप्रेत नाही, असेही हिरे म्हणाले.
या निमित्ताने प्रदीर्घ राजकीय परंपरा असलेल्या हिरे कुटुंबीयांवर प्रतिस्पर्धी दादा भुसे यांनी आघात केल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. माजी आमदार हिरे आणि अन्य सदस्यांनी या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता हिरे राजकीय वाऱ्याची दिशा ओळखून नुकतेच भाजपवासी झाले होते. मात्र तरीही ही कारवाई झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.