

Ashok Kharat case : भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. याशिवाय अवतारपूजा व मंतरलेल्या खड्यांच्या नावाखाली अनेक हायप्रोफाईल लोकांकडून कोट्यावधी रुपये लुबाडल्याचेही समोर आले आहे. महिलांचे लैगिंक शोषण व आर्थिक फसवणूक प्रकरणात त्याच्यावर आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने रविवारी झालेल्या सुनावणीत अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ केली असून चार दिवस वाढवले आहेत. त्यानुसार १ एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
खरातने वेगवेगळे फसवणुकीचे फंडे वापरत हायप्रोफाईल लोकांची आर्थिक लूट केली. भोंदूगिरीच्या आडून कोट्यावधींची माया जमवली. खरातने जमवलेल्या मायेच्या स्रोताची माहिती एसआयटी पथकाकडून घेण्यात आली आहे. खरात अतिशय योजनाबद्ध पद्धतीने आर्थिक व्यवहार करत असल्याचं समोर आलं आहे.
कोणताही डिजिटल पुरावा मागे राहणार नाही याची विशेष दक्षता खरातने घेतल्याचे तपासात समोर आले आहे. खरातचे बँक डिटेल्स तपासले असता हे स्पष्ट होते की, त्याने ७० टक्के व्यवहार हे कॅश स्वरुपातच केले. खरातच्या या ऑन्ली कॅश पेमेंट स्ट्रॅटेजीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
एसआयटीने भोंदू खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी त्याची व्यक्तिगत व संस्थानची बॅंक खाती गोठावली आहे. पथकाने त्याची चार बॅंक खाती तपासली. त्यात, फिर्यादी किंवा तक्रारदारांकडून थेट ऑनलाइन व्यवहार झाल्याचे आढळून आले नाही. सत्तर टक्के व्यवहार त्याने कॅश स्वरूपातच केल्याचे समोर आले आहे.
तसेच कोणतही प्रॉपर्टी, जमीनजागा खरेदी करताना तो केवळ स्वतःच्याच किंवा पत्नीच्या नावाने खरेदी न करता पार्टनरचे नाव देखील खरेदीखतात सामाविष्ट करीत असे. त्यामुळे पैसे देतेवेळी वाटे पडत असत आणि एकाच्या नावे फार मोठी उलाढाल दिसत नसे. यातून इतरांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी करून स्वतः नामानिराळे राहण्याचा त्याचा प्रयत्न दिसून येतो. आपले बहुतांश व्यवहार तो मोठ्या चलाखीने रोख स्वरूपातच करत असे. त्यामुळे त्याच्या आर्थिक व्यवहारांचा माग काढणे कठीण जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (nashik News)
ऑफिसबॉयच्या खात्यावरही मोठा व्यवहार नाही
आर्थिक व्यवहार करताना खरात किती सावध असायचा याचे उदाहरण म्हणजे, त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव याच्या खात्यावर देखील कोणतीही मोठी रक्कम वर्ग झालेली नसल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्याकडे येणाऱ्या हायप्रोफाईल भक्तांकडून तो नेहमी रोख स्वरुपात पैसे घ्यायचा. चेक किंवा ऑनलाईन पद्धतीने तो पैसे घेत नसे. याच रोख पैशांच्या माध्यमातून अशोक खरात याने मोठे साम्राज्य उभे केले.
चेक परत करत स्विकारली कॅश
दरम्यान, नेवासा येथील एका व्यापाऱ्याला बनावट अंगठी आणि दागिने विकताना खरातने धनादेश परत करून रोख रकमेची मागणी केल्याची बाब समोर आली आहे. त्याने अडीच लाख रुपये रोख घेतल्याचे समोर आले आहे. खरातच्या या कॅश पेमेंट स्ट्रॅटेजीमुळे त्याच्याकडे नेमकी संपत्ती किती आहे, हे शोधून काढणे तपास यंत्रणांपुढे मोठे आव्हान आहे. कारण खरात तपासात पाहिजे तसे सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.