Ahilyanagar News : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया अहिल्यानगरच्या मैदानात प्रचारासाठी उतरले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
"विधानसभा निवडणूक ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न साकार करण्यासाठीचे युद्ध आहे. भ्रष्टाचारी विरोधकांना धूळ चारयाची आहे. महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि अभिमान राखण्यासाठी एकजुटीने महाविनाश आघाडीला धडा शिकवा. महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवू, तर शेतकऱ्यांच्या सन्मान निधीत देखील वाढ करणार", असे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले.
भाजप (BJP) नेते केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची कर्जत-जामखेड मतदार संघात प्रचार रॅली काढली होती. भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे उपस्थित होते.
ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, "या निवडणुकीत देश आणि राज्याचा विनाश करणाऱ्या आघाडीला पराभूत करायचे आहे. त्यासाठी जागृत राहा. जातीपातीमध्ये विभाजन करणारे अन् मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे आणि आरक्षण संपवण्याची भाषा करणारे, असे महाविकास आघाडीचे (MVA) तीन घटक पक्ष आहेत. त्यांच्यापासून सावध राहा". मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,हरियाणा आणि आता त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वसमावेशक विकासासाठी भाजपा प्रणित महायुती सरकार सत्तेत आणायचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
'महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांचा खरा भ्रष्टाचारी चेहरा उघड झाला आहे. विकास स्थगित करण्याचे काम करणारी महाविनाश आघाडी एकीकडे, तर दुसरीकडे वेगाने विकास करणारे डबल इंजिन सरकार आहे. एकीकडे राज्याची तिजोरी रिकामी करणारी महाविनाश आघाडी, तर दुसरीकडे सर्वांसाठी तिजोरी खुली करणारी महायुती आहे', अशा शब्दात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विरोधकांवर टीका केली.
"केंद्रातील मोदी सरकार अन् राज्यातील महायुतीचे सरकार हे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे आहे. समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारे सरकार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा विकास आणि प्रगती साधणाऱ्या महायुती सरकारला निवडून द्याल, तर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये, किसान सन्मान निधी योजनेचे 12 हजार वरून 15 हजार रुपये इतकी वाढ होईल आणि त्याचा लाभ गोरगरीब जनतेला होईल", असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.