Ahilyanagar News : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजळे हॅटट्रिक करणार, असे एक्झिट पोलचा अंदाज आहे. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीपूर्वीच जल्लोषाची तयारी केली आहे.
पंचरंगी लढत होत असतानाच, भाजप, महायुतीमध्ये बंडखोरांचे आव्हान असतानाच मोनिका राजळे यांनी मतदानाच्या दिवशी वारं फिरवल्याची चर्चा एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच मतदारसंघात रंगली आहे.
भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात शांत, संयमी नेतृत्व म्हणून प्रतिमा आहे. यावेळी त्यांच्या भाजप पक्षातील स्वकीयांनी चांगलेच आव्हान उभं केले होते. बंडखोरांची त्यांच्यासमोर फौज उभी होती. यातच महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यामुळे हे आव्हान अधिकच तगडं झालं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांनी गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली होती. त्यामुळे ते देखील यंदाच्या निवडणुकीत कमाल करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कट्टर समर्थक तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून कायम राहिल्या. यामुळे आमदार राजळे या सर्वांवर मात कशी करतात, राजकीय विजयाचे समीकरण कसे जुळवून आणतात, याची उत्सुकता होती.
एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहे. यात संभाव्य विजयी उमेदवार म्हणून शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांच्या बाजुने कल दिसतो आहे. यामुळे भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोनिका राजळे यांनी विजयाचे वारे आपल्या बाजुने कसे करून घेतले, या एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.
मतदानाच्या दिवशी मोनिका राजळे यांना वेगळाच प्रसंगाने समोरे जावे लागले होते. पाथर्डीतील शिरसाटवाडी इथं बूथ ताब्यात घेण्याचा प्रकार झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. मोनिका राजळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिरसाटवाडीत धाव घेतली. तिथं गावकऱ्यांच्या हुल्लडबाजीला त्यांना समोरे जावे लागले. काही तरुणांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. राजळे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना इजा होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील खोलीत स्वतःला कोंडून घेतले. यानंतर पोलिस बंदोबस्त बोलावून घेत त्या शिरसाटवाडीतून बाहेर पडल्या. 'या सर्व प्रकाराला मातृत्वातून माफ केलं', अशी प्रतिक्रिया मोनिका राजळे यांनी दिली.
या प्रकारानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्याने त्यात संभाव्य विजयी उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांची हॅटट्रिक निश्चित असल्याचा कल आहे. मोनिका राजळे यांनी लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेची तयारी केली होती. सुजय विखे यांना पाथर्डी-शेवगावमधून चांगली लीड मिळवून दिला होता. तसेच भाजपच्या प्रत्येक योजना त्यांनी मतदारांपर्यंत पोचवली होती. तसेच 'लाडकी बहीण' योजनांचा लाभ मिळवून देण्यात,त्यांचा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ आघाडीवर होता. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.