लासलगाव : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील लासलगाव विंचूरसह (Lasalgaon) सोळागाव पाणीपुरवठा योजना ऐन पावसाळ्यात बंद आहे. याबाबत गेल्या महिन्यात बैठक होऊन काम सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तरीही काहीच हालचाली नसल्याने पिण्याचे पाणी कोण अडवते आहे, असा प्रश्न शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी विचारला आहे. (Shivsena leaders deemands intervention in water supply of lasalgaon)
लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजना ऐन पावसाळ्यात बंद असल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांची लासलगाव शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मालेगाव येथे भेट घेत कैफियत मांडली. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी लासलगावचा पिण्याचा पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासित केले.
लासलगाव हे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात येते. श्री. भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलवाहिनीसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, मात्र अजून या कामास सुरुवात न झाल्याने लासलगावमधील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. श्री. भुजबळ यांनी अधिका-यांसमवेत लासलगाव ग्रामपंचायत येथे बैठक घेत कार्यवाहीच्या सूचना दिल्या, मात्र महिना उलटूनही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वंचित आहे. ऐन पावसाळ्यात देखील लासलगाव विंचूरसह पाणीपुरवठा योजनेचे लाभार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
श्री. भुसे यांनी संबंधित अधिका-यांना ही जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करून ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. नवीन जलवाहिनीसाठी वीस कोटी रुपये मंजूर असून याबाबतही पालकमंत्री भुसे यांनी अधिका-यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या. यामुळे लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.
शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे, कांदा व्यापारी लासलगाव मर्चंट बॅंकेचे संचालक प्रवीण कदम, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष सूरज नाईक उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.