

Maharashtra politics : भुसावळ नगरपरिषदेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव होते. एकुण ८ उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गायत्री चेतन भंगाळे यांनी एक हजार ८४७ मतांनी पराभव केला होता. या निसटत्या पराभवाची चर्चा जिल्हाभरात झाली होती.
निवडणूक निकालानंतर गायत्री भंगाळे (गौर) यांनी भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली होती. मात्र रजनी सावकारे यांनी भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार जळगाव येथील जातपडताळणी समितीकडे केली. भंगाळे यांनी निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. त्याच दिवशी त्यांना जातप्रमाणपत्र मिळाले होते. मात्र, भंगाळे यांच्या नातेवाइकांचा मूळ रहिवास उत्तर प्रदेशातील महुबा जिल्ह्यातील असल्याची तक्रार रजनी सावकारे यांच्यासह संजय तायडे, राहुल तायडे आणि प्रमोद सावकारे यांनी समितीकडे केली.
दरम्यान रजनी सावकारे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जातपडताळणी समितीने पुराव्यांची तपासणी केली. त्यावर भंगाळे यांचा दाखला अवैध असल्याचा निकाल जिल्हा जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोंदार्ड, सचिव एन. एस. रायते, सदस्य आर. आर. महाजन यांच्या समितीने दिला. भंगाळेच नव्हे, तर हा दाखला देणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांवरही समितीने ठपका ठेवला आहे. 'प्रांताधिकाऱ्यांनी कोणत्याही पुराव्यांची सखोल चौकशी न करता हा दाखला दिला', असे निरीक्षण नोंदवत समितीने संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले.
यानंतर आता भुसावळमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करून नगराध्यक्षपदावर विराजमान झालेल्या गायत्री भंगाळे (गौर) यांच्या जातीच्या दाखल्याला जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या नगराध्यक्षपदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.