Shivsena BJP politics news: लोकसभेच्या जागा वाटपात नाशिक मतदार संघाचा प्रश्न जटिल झाला आहे. महायुतीच्या तीन ज्येष्ठ मंत्र्यांशी हा प्रश्न संबंधित आहे. विशेष म्हणजे नाशिकची जबाबदारी फडणवीस यांचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याकडे आहे. मात्र या विवंचनेच्या प्रसंगी ते कुठे आहेत? असा प्रश्न कार्यकर्ते विचारीत आहेत.
नाशिक मतदार संघासाठी महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या एक महिन्यांपासून ते प्रचारात व्यस्त आहेत. मात्र महायुतीला ही जागा कोणाची?, उमेदवार कोण? हा निर्णय करता आलेला नाही. त्याला इतका वेळ झाला आहे की, महायुतीचे नेते आणि इच्छुक दोन्हीही आता नाउमेद झाले आहेत. मतदारांमध्ये देखील महायुती विषयी नकारात्मक संदेश जाऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा तिढा सोडवणार तरी कोण याची चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीचे नाशिक जिल्ह्यात दोन वरिष्ठ मंत्री आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षाने नाशिकची जबाबदारी फडणवीस यांचे विश्वासू सहकारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan ) यांच्यावर सोपविली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे हे पालकमंत्री आहेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे इच्छुक तसेच या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. तिन्ही नेते मंत्री आहेत.
मात्र त्यांना नाशिकचा प्रश्न सोडविता आलेला नाही. प्रश्न सोडविणे तर दूर हा प्रश्न सोडविण्याची क्षमता नसल्याचा संदेश मतदारांमध्ये जात आहे. त्याला कंटाळून ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा. किमान मतदानाच्या दिवशी अर्थात 20 मे पर्यंत तरी घ्यावा असा उपरोधिक टोला महायुतीला लगावला आहे.
उमेदवारीच्या वादापासून अलिप्त होण्यासाठी भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे देखील जाहीर केले आहे. मात्र तरीही मतदारसंघ कोणाला आणि उमेदवार कोण याचा निकाल लागू शकलेला नाही.
भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक तसेच शासकीय अडचणीच्या समस्यांबाबत मंत्री गिरीश महाजन सातत्याने पुढाकार घेत असतात. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा गृह जिल्हा जळगावमध्ये देखील बऱ्याचशा हालचाली त्यांच्या नियंत्रणा बाहेर गेल्या. नाशिकच्या जागेबाबत भाजपच्या नाशिकच्या नेत्यांचा आग्रह व समजूत घालण्यात देखील त्यांनी फारसा रस दाखवला नाही. त्यामुळे या नेत्यांना थेट फडणवीस यांच्याकडे धाव घ्यावी लागली.
पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकची जागा मिळावी यासाठी जोरदार बॅटिंग केली. भुजबळ यांनीही आपली पूर्ण ताकद पणाला लावली. तरीही नाशिकचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे यामागे कोणत्या अज्ञात राजकीय शक्ती कार्यरत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी या वादामुळे गोंधळले आहेत. महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आता उमेदवार कोण? आणि जागा कोणाला? या चर्चेत फारसा रस दाखवत नाहीत.
महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांना घ्यावी लागते. हे तिन्ही महत्त्वाचे मंत्री या प्रश्नापासून हात राखून आहेत. महायुतीचे राजकारण कोणत्या दिशेला चालले यावरून मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. या गोंधळातून महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिलासा देणार तरी कोण याची विचारणा पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.