Jayant Patil Politics : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Constituency 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी बंडखोरीची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीचा दौरा केला. या दौऱ्यापासून संतोष चौधरी मात्र लांबच राहिले. त्यामुळे पाटील यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. परिणामी, चौधरी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास राष्ट्रवादी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार तसेच अन्य नेते लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात झोकून देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे असलेल्या मतदारसंघातील बंडोबांचे बंड शांत करण्याचे काम जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी काल तातडीचा दौरा केला. रावेर आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांना सूचना दिल्या.
जयंत पाटील या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात नेमक्या सूचना देण्यावर भर होता. दिंडोरी आणि रावेर या दोन्ही ठिकाणी पक्षाला बंडखोऱ्यांचा सामना करावा लागत आहे. रावेर मतदारसंघातून माजी आमदार चौधरी हे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीची घोषणा केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चौधरी यांच्याशी चर्चा केली. त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. काल प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी चौधरी यांना रावेर येथील बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मात्र चौधरी तिकडे फिरकलेच नाहीत. मतदारसंघातील विवाह समारंभांना उपस्थित राहण्याचे कारण देत ते या बैठकीपासून लांब राहिले. त्यामुळे बंडखोरांना शांत करण्याचा इरादा असलेल्या जयंत पाटील यांना रित्या हाती परतावे लागले.
संतोष चौधरी यांनी प्रदीर्घकाळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचाराने राजकारण केले आहे. त्यांनी शरद पवार यांचा विचार अद्याप सोडलेला नाही. त्यांची काही नाराजी असल्यास त्याबाबत मार्ग काढला जाईल. त्यांच्याशी फोनवरून चर्चा देखील झालेली आहे. त्यामुळे चौधरी बंडखोरीचा विचार सोडून देतील यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील लक्ष घालणार आहेत. पुढील आठवड्यात पवार यांचा रावेर मतदारसंघात दौरा आहे. यावेळी हा प्रश्न निकाली निघेल, असा दावा पाटील यांनी यावेळी केला.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांची चार तास बंदरावर चर्चा केली. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेते प्रचारापासून लांब असल्याची माहिती त्यांना दिली. या पदाधिकाऱ्यांशी पाटील यांनी चर्चा करून त्यांना प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री अरुण गुजराती, माजी आमदार अरुण पाटील, डॉ सतीश पाटील, वाल्मीक पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जळगाव येथील उमेदवार करण पवार यांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.