शिरपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे व नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून येथील आमदार अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभा व विधान परिषदेच्या आखाड्यातील अजिंक्यवीर अशी प्रतिमा असलेल्या पटेल यांच्या उमेदवारीमुळे त्यांना तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला धावपळ करावी लागणार आहे.
अमरिशभाई पटेल २००९ पासून या मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. २००९ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसकडून बिनविरोध निवडून जाण्याची किमया त्यांनी केली. २०१५ मध्येही भाजपचे डॉ. शशिकांत वाणी यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात अमरिशभाई पटेल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीत भाजपची सर्व मते मिळवतानाच त्यांनी महाविकास आघाडीची मतेही मोठ्या प्रमाणात खेचली. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत आहेत.
राजकीय वाटचाल अशी
अमरिशभाई पटेल यांनी १९८५ मध्ये शिरपूर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणाला सुरवात केली. १२ वर्षे ते नगराध्यक्ष होते. १९९०, १९९५, १९९९ व २००४ अशा सलग चार निवडणुकीत ते काँग्रेसकडून शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. २००३-०४ मध्ये त्यांनी शालेय शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
मतदानाबाबत उत्सुकता
विधान परिषद निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. साक्री व धडगाव पालिकेवर प्रशासक असल्याने तेथून मतदान होणार नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकूण ३९९ मतदार असून त्यात भारतीय जनता पक्षाचे १९९, काँग्रेसचे १३६, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, शिवसेनेचे २०, एमआयएमचे नऊ, समाजवादी पक्षाचे चार, अपक्ष नऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक व बहुजन समाज पक्षाच्या एका मतदाराचा समावेश आहे. अमरिशभाईंचा लौकिक लक्षात घेता भाजपविरोधात मतांची मोट बांधून अखेरपर्यंत टिकवू शकेल, असा प्रभाव असलेला उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे. पोटनिवडणुकीतील पराभवाचे प्रचंड अंतर लक्षात घेता या निवडणुकीत मतदानाची परिस्थिती काय असेल याबाबत उत्सुकता आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.