Nashik APMC News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या सत्तांतरानंतर आता नवनिर्वाचित सभापती कल्पना चुंभळे यांनी सभापती काळात देविदास पिंगळे यांनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत एकच चर्चा रंगली आहे.
पिंगळे यांच्या काळात बाजार समितीत 35 अनावश्यक सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. दर महिन्याला 9 लाख 27 हजार रुपये इतके वेतन त्यांना द्यावे लागत होते. सभापती कल्पना चुंभळे व नवनिर्वाचित संचालक मंडळाने हा अनावश्यक खर्च कमी करत 35 सुरक्षारक्षकांना कामावरुन कमी केले आहे. आता त्यांच्याऐवजी समितीचे पहारेकरीच हे काम बघणार आहेत.
नाशिक बाजार समितीत राष्ट्रवादीचे पिंगळे विरुद्ध भाजपचे चुंबळे हा संघर्ष सर्वश्रुत आहे. यातुनच चुंभळे गटाने पिंगळे गटाचे सदस्य आपल्या बाजुने वळवत राष्ट्रवादीच्या देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला. भाजपच्या कल्पना चुंभळे यांना सभापती केलं. राष्ट्रवादी व भाजप दोन्ही महायुतीतील घटक पक्ष असूनही ही बंडखोरी रोखण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला यश मिळालं नाही. त्यामुळे नाशिक बाजार समितीचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं.
बाजार समितीचे सभापतीपद हाती घेताच कल्पना चुंभळे यांनी पिंगळे यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे. चुंभळे यांच्याकडून संचालक मंडळाला विश्वासात घेऊन हे सर्व बदल करण्यात येत आहेत. सुरक्षेच्या नावाखाली खासगी ठेकेदाराकडून ३५ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. चुंभळे यांनी या सुरक्षा रक्षकांची आवश्यकता नसल्याने कमी केले आहे.
दर महिन्याला एका सुरक्षारक्षकाला बाजार समितीकडून 22 हजार 500 रुपये इतके वेतन दिले जात होते. मात्र, समितीचे पहारेकरी असताना खासगी सुरक्षारक्षकांची गरज नसल्याचे स्पष्ट करत संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. उपसभापती विनायक माळेकर, शिवाजी चुंभळे, सविता तुंगार, तानाजी करंजकर, संदीप पाटील यांच्या उपस्थित ही माहिती देण्यात आली आहे.
याआधीही राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे माजी सभापती पिंगळे यांनी हाती घेतलेला महत्वाकांक्षी खत प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सभापती श्रीमती चुंभळे यांनी घेतला. या प्रकल्पामुळे बाजार समितीवर आर्थिक भार पडेल असा दावा त्यांनी केला. त्यामुळे चुंभळे यांच्याकडून पिंगळे यांनी घेतलेले आणखी कोणकोणते निर्णय रद्द केले जातात हे देखील पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.