

Nandurbar News: उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कथित ध्वनीफीत प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते फरार असल्याचे सांगितले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अधिकृत अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या ध्वनीफितींमधील संभाषणांमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ध्वनीफितींमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह तसेच जातीवाचक स्वरूपाची विधाने करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. या तक्रारींमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे , आमदार आमश्या पाडवी यांच्याबाबतही आक्षेपार्ह वक्तव्ये झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व तक्रारींच्या आधारे विजय चौधरी यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक वेगळा मुद्दा समोर आला. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनीफिती चोरून त्या इतरांकडे विकण्यात आल्या आणि नंतर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली होती. मात्र, चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
व्हायरल झालेल्या कथित ध्वनीफितींमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी, अमरीश पटेल यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी संभाषण असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या क्लिप्समुळे संबंधित नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मात्र, संबंधित नेत्यांनी हे सर्व दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. या कथित ध्वनीफितींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवाजात छेडछाड करून संभाषण तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारमध्ये दररोज नवीन कथित ध्वनीफिती सोशल मीडियावर समोर येत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. भाजपमधील अंतर्गत घडामोडी, स्थानिक नेतृत्वातील मतभेद आणि ध्वनीफितींचे राजकारण या सर्व मुद्द्यांमुळे चर्चांना उधाण आले आहे.
विजय चौधरी यांच्या अटकेनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलीस तपासातून नेमके कोणते पुरावे समोर येतात, कथित ध्वनीफितींची सत्यता काय आहे आणि या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात, याकडे उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विजय चौधरी यांना आज (शुक्रवारी) दुपारी 2 वाजता नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालय त्यांना पोलीस कोठडी सुनावते की न्यायालयीन कोठडी, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षकहेमंत पाटील यांच्या पथकाने गुरुवारी रात्री विजय चौधरी यांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली असून, संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील आणि जातीवाचक स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप विजय चौधरी यांच्यावर आहे.
या प्रकरणी डॉ. हिना गावित यांच्या भावाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, विनयभंग तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय चौधरी यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांसह विनयभंगाशी संबंधित गुन्ह्याचाही समावेश आहे. या सर्व प्रकरणांचा तपास सध्या सुरू असून, पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.