

Nashik politics : नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले होते. पण या सर्व उमदेवारांचा निवडणुकीत पराभव झाला. पुढे स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने एक-एक करत महाविकास आघाडीचे यातील जवळपास अर्धे उमेदवार गळाला लावले आहेत.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या ७ उमेदवारांच्या हातात आता कमळ आहे. विशेषत: शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांवर भाजपने ही जादू केली आहे. कॉंग्रेसचाही एक उमेदवार भाजपने गळाला लावला आहे. महाविकास आघाडीचे नेते गळाला लावून त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊनच भाजपने आपली ताकद वाढवली आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने गणेश गिते यांना उमेदवारी दिली होती. ते भाजपच्या राहुल ढिकले यांच्या विरोधात लढले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपत घरवापसी केली. राहुल ढिकले यांचा विरोध असतानाही गणेश गितेंचे गिरीश महाजनांच्या आशिर्वादाने जोरदार कमबॅक झालं.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला. पण नंतर महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याच बडगुजरांना सीमा हिरे यांचा विरोध झुगारुन भाजपने पक्षात प्रवेश दिला.
दिंडोरीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांनी सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी दिली होती. पण आगामी जिल्हापरिषद निवडणुक विचारात घेऊन भाजपने सुनिता चारोस्कर यांनाही गळाला लावत पक्षात प्रवेश दिला आहे. दिंडोरीत आपल्याच मित्रपक्षाच्या आमदाराची कोंडी भाजपने केली आहे.
सिन्रर तालुक्यात शरद पवारांनी उदय सांगळे यांना उमेदवारी दिली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सांगळेंनी निवडणूक लढवली. सांगळे यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सागळेंना गळाला लावत सिन्नर तालुक्यात आपली ताकद वाढवली आहे.
मनमाड-नांदगाव विधानसभा मतदारसंघात तर शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेचे उमदेवार गणेश धात्रक यांना भाजपने सर्वात आधी गळाला लावलं होतं. गणेश धात्रक यांचा फार आधीच भाजप प्रवेश झाला. मनमाडमध्ये धात्रक यांचे मोठे वलय आहे, सुहास कांदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर येथील ठाकरे गटाची सगळी मदार त्यांच्याच खांद्यावर होती. पण भाजपने गणेश धात्रकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं.
त्यानंतर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले ठाकरे सेनेचे अद्वय हिरे हेही आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेचा महत्वाचा शिलेदार भाजपत गेल्याने मालेगाव बाह्यमध्ये ठाकरे सेना कमजोर पडली आहे.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले शिरीष कोतवाल यांनीही आता भाजपत प्रवेश केला आहे. कोतवाल यांनी चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण आहेर यांच्याच पुढाकारातून कोतवाल यांना भाजपने गळाला लावलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.