

Ahilyanagar District Bank chairman election dispute : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या बिनविरोध निवडीला सहकार न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली आहे.
सुजय विखे पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक प्राधिकरण आणि सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक यांना सोमवारी (ता.16) म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने काढला आहे. घोगरे यांचे वकील सुरेश लगड यांनी या माहितीला दुजोरा दिला.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी सुजय विखे पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप घेतला आहे. राहुरीतील बाबुराव तनपुरे सहकारी कारखान्याचे थकबाकीदार संचालक असल्याचा त्यांचा दावा आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेकडून वैयक्तिक हमीवर कर्ज घेऊन ते थकवले आहे.
त्यानुसार ते सहकार कायद्यातील तरतुदींनुसार थकबाकीदार ठरतात. त्यांचा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोगरे यांचा हा आक्षेप फेटाळून लावला. यावर घोगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Court) औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने ती याचिका निकाली काढताना, उच्च न्यायालयाने सहकार न्यायालयात दाद मागणे संयुक्त ठरेल, असे निरीक्षण नोंदवले.
एकनाथ घोगरे यांनी यावर सहकार न्यायालयात याचिका दाखल केली. सुजय विखे पाटील कारखान्याचे संचालक थकबाकीदार असल्याचा दावा करत, त्यांना सहकार कायद्यानुसार अपात्र ठरवावे, अशी याचिका घोगरे यांनी सहकार न्यायालयात दाखल केली आहे. निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी सुजय विखे पाटील यांना बिनविरोध करण्याचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी देखील या याचिकेत केली आहे.
बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत सुजय विखे पाटील यांची उमेदवारी व निवड या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील, असा आदेश द्यावा. जिल्हा बँकेत तनपुरे सहकारी कारखान्याचे कर्ज खाते, हमीदार सुजय विखे पाटील यांचे नाममात्र सभासदत्व व निवडणूक संबंधिचे सर्व अभिलेख जतन करण्याचे व त्यात कोणतेही बदल न करण्याचे आदेश व्हावेत, अशीही मागणी याचिकेद्वारे घोगरे यांनी केली आहे. सहकार न्यायालयाने या याचिकेवर सोमवारी (ता. 16) म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती वकील सुरेश लगड यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.