

Nashik Politics : येवलेकरांना केवळ विकास हवा आहे, हाच आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीत जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल अशी ठाम खात्री राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मुंबईत हॉस्पिटलमध्ये सलाईन घेत असतानाही मंत्री भुजबळ यांनी महायुतीच्या प्रचार सभेत येवलेकरांशी ऑनलाईन संवाद साधला. उपचार घेत असल्यानाही मंत्री भुजबळ यांना येवल्याविषयी तळमळ असल्याची जनभावना प्रचार सभेत दिसत होती. दरम्यान, ‘येवल्यात आम्ही कुणाच्याही जमिनी, बँका लुबाडल्या नाही किंवा पैसेही बुडवले नाहीत’, असा टोलाही त्यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई आठवले गट मित्र पक्ष घटक पक्षातील येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी व २६ नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज येवला शहरातील शनी पटांगणावर जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दृकश्राव्य माध्यमातून येवलेकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘माझी इच्छा असताना देखील मला या निवडणुकीत आपल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. नुकतीच माझी एक शस्त्रक्रिया झाल्याने मी आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही. त्यामुळे आपल्यासोबत या माध्यमातून संवाद साधत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला येवला सतत दुष्काळाच्या छायेत होता. दोन दशकांपूर्वी २००४ साली मला आपण आपली सेवा करण्याची संधी दिली. तेव्हापासून आपण येवल्याचा कायापालट करू शकलो. येवल्यात झालेला बदल आपण पाहतच आहात. आजवर आपल्या सर्वांची भक्कम साथ असल्यामुळेच हे शक्य झाल्याचा पुनरूच्चार भुजबळ यांनी केला.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘आजवर कोट्यावधी रुपयांची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली. त्यामुळे येवलेकरांनी मला पाच वेळा सातत्याने निवडून दिले. आपण येवल्यात अनेक विकासकामे केली आहेत. मांजरपाडा सारखे अत्यंत कठीण काम आपण पूर्ण केले आहे. राज्यातील हा पथदर्शी असा पहिलाच प्रयत्न असून तो यशस्वी झाला आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. आपण येसगाववरुन येवला शहरासाठी पाणी आणत आहोत. हे पाणी येऊ नये यासाठी काही मंडळीनी राजकारण केले, त्यात खोडा घातला. पण हा प्रश्न आपण सोडविला आहे. पुढील काही महिन्यातच शहराच्या सर्व भागात दररोज आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘येवल्यातील असंख्य कामे प्रगतीपथावर आहेत. पिंपळस ते येवला या रस्त्याचे ५६३ कोटी रुपयांच्या निधीतून चौपदरी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. तसेच कोपरगाव येवला मनमाड चौपदरी कॉंक्रीटरोड सह येवला बायपास रस्ता आपण करीत आहोत. विस्थापित गाळेधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने लातूर पॅटर्नच्या धर्तीवर आपण लवकरच सोडविणार आहोत. आगामी काळात आपण येवला शहरामध्ये जी विकासकामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्या पसंतीला उतरल्याचे मला कळाले आहे’, असे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘येवला नगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेले उमेदवार हे तळागळात काम करणारे आहेत. नगराध्यक्षपदासाठी आपण एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. आपले उमेदवार राजाभाऊ लोणारी हे मितभाषी आणि सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे आहेत. राजाभाऊ लोणारी यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी कराल. मी जरी येवल्यात नसलो तरी समीर आणि पंकज हे तुमच्या सेवेसाठी येवल्यात आहेत. जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच प्रेम हे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल’, अशी मला खात्री असल्याचे भुजबळ म्हणाले.
फिर भी जी गया
भुजबळ यांनी सर्वात शेवटी शेर म्हणून भाषणाची सांगता केली. तो असा,
“संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है|
सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया,तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया||”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.