

Maharashtra Politics : सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभेच्यावेळी त्यानंतर आता मार्च महिन्यात राज्यसभेच्या झालेल्या निवडणुकीतही भुजबळांच्या नावाची चर्चा जोरात होती. मात्र, अजित पवार यांचे अपघाती निधन झाले असल्यामुळे या जागेसाठी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पक्षाने संधी दिली. आता सुनेत्रा पवार यांच्या जागेवर पुन्हा भुजबळांच्या नावाची चर्चा होत आहे.
मात्र, भुजबळ राज्यसभेवर जाणार का? इथपासून ते ओबीसी राजकारणाचा आवाज दिल्लीत जाईपर्यंतच्या पाच शक्यता आहे. त्या जाणून घेऊ..
1. भुजबळ राज्यसभेवर जाणार का?
लोकसभा निवडणुकीपासून छगन भुजबळ दिल्लीच्या राजकारणात जाण्यास इच्छुक होते. स्वत: भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी त्यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले होते. मात्र, त्यावेळी महायुतीच्या वाटाघाटीचा घोळ सुरु होता, त्यातून जास्त उशीर झाल्याने भुजबळांनीच उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता याही वेळेला त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मात्र, सध्या ते राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत मंत्रीपद सोडून ते राज्यसभेचा पर्याय स्वीकारतील का, हा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आहे.
यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. मी ज्येष्ठ मंत्री आहे. त्यामुळे मला राज्यसभेवरच पाठवा असा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतल्यास भुजबळांना दिल्लीला जावे लागेल अशी शक्यता आहे. परंतु भुजबळांना पक्षाकडून विचारणा न झाल्यास भुजबळ स्वत:हुन राज्यसभेवर जाण्याची मागणी करण्याची शक्यता यावेळी जवळपास नाही. कारण त्यांच्यासाठी मंत्रिपद अधिक महत्वाचं आहे.
2. राज्यसभेवर गेल्यास स्थानिक राजकारणातून एक्झिट?
भुजबळांचे वय बघता ते फार दिवस सक्रिय राजकारणात राहतील ही शक्यता कमी आहे. शिवाय राज्यसभेवर जाणे म्हणजे निवृत्तीकडे वाटचाल करणे असा संकेत मतदारांमध्ये जाऊ शकतो. मागे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बरेच दिवस मतदारसंघात उपलब्ध राहता आले नाही. अशात भुजबळ दिल्लीच्या राजकारणात गेले म्हणजे त्यांची महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणातून आपोआप एक्झिट होईल. कदाचित राष्ट्रवादीत भुजबळांच्या जागी नव्हे नेतृत्व उदयास येऊ शकतं. मात्र भुजबळांप्रमाणे या नव्या नेतृत्वाला मतदार इतक्या सहजपणे स्विकारतील का हाही मोठा सवाल आहे. याचाही विचार भुजबळ कुटुंबीय करतील असे दिसते.
3. येवल्यातून पोटनिवडणूक कोण लढणार? पंकज की समीर?
भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवल्याची विधानसभेची जागा रिक्त होईल. त्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हा प्रश्न आहे. यात भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ आधीच विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच पंकज भुजबळ ही पोटनिवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.
समीर भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून येवला मतदारसंघात सक्रीय आहे. भुजबळांना केंद्रात पाठवण्याच्या हालचाली यापूर्वीही घडल्या होत्या, तेव्हापासून समीर भुजबळ हे येवल्यात तळ ठोकून आहेत. नगरपालिका निवडणुकीत भुजबळ आजारी असल्याने मतदारसंघात येऊ शकले नाही. तेव्हा समीर यांनीच खिंड लढवली आणि त्यांना त्यात यश देखील आलं. पालिका निवडणूक याच पोटनिवणुकीची रंगीत तालीम होती असही त्यावेळी म्हटलं गेलं. तेव्हापासून येवल्यात पोटनिवडणुकीचे वारे वाहत असून समीर भुजबळ त्यासाठी तयारी करत आहे. ते रोज येवल्यात असून आपला जनसंपर्क बळकट करत आहेत.
दरम्यान समीर भुजबळांना पोटनिवडणुकीचे तिकीट दिल्यास आणि ते विजयी झाल्यास भुजबळांच्या घरात एक खासदार आणि दोन आमदार होतील. हे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मान्य असेल का? हाही प्रश्न आहे. मात्र, येवल्यात भुजबळांशिवाय पर्याय नसल्याने राष्ट्रवादीला हे मान्य करावं लागेल असे राजकीय विश्लेषक सांगतात. शिवाय जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वलय टिकवून ठेवण्यासाठी भुजबळ कुटुंबियांशिवाय पर्याय नाही.
4. भुजबळांनंतर मंत्री कोण होणार?
छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागी मंत्रीपद कुणाला दिलं जाईल हा उत्सुकतेचा विषय आहे. कारण समीर भुजबळ असो व पंकज भुजबळ दोघेही राजकारणात तसे नवीन आहेत. म्हणजे भुजबळांइतके जेष्ठत्व व अनुभव त्यांच्याकडे निश्चितच नाही. त्यातून मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावण्यासाठी राष्ट्रवादीमधील अनेकजण पुढे येतील यातील काहीजण मंत्रिपदावर दावा देखील सांगू शकतात. या सगळ्यात भुजबळांच्या घरातून मंत्रिपद जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत इतर एखाद्या मंत्रिपद हुकलेल्या आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
5. ओबीसी राजकारणाचा आवाज दिल्लीत
भुजबळ राज्यसभेवर गेल्यास गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर अनेक वर्षांनंतर ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारा आवाज संसदेत घुमू शकेल. ओबीसी समाजाचे प्रश्न दिल्ली दरबारी पोहोचतील. त्यामुळे भाजपची देखील पंसती भुजबळांच्या नावाला आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे हत्यार उपसले आहेत. त्यामुळे याच ओबीसी चेहऱ्याचा केंद्रात फायदा करुन घेण्यासाठी लोकसभेला भुजबळांच्या उमेदवारीचा आग्रह स्वत:अमित शहांनी धरला होता. देशभरात भुजबळांनी ओबींसीचे जाळे विणले आहे. विधानसभेला जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन रान उठवूनही भुजबळांमुळे महायुतीला विशेषत: भाजपला फायदा झाला होता. जरांगे फॅक्टर भुजबळांपुढे निष्प्रभ ठरला होता. त्यामुळे भुजबळांच्या चेहऱ्याचा फायदा घेण्यासाठी भाजप राष्ट्रवादीच्या कोट्यातून का होईना पण भुजबळांच्या नावाला पसंती देऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.