
BJP vs Congress Maharashtra : लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोचला आहे. संगमनेरमध्ये हा संघर्ष कोणत्या ना कोणत्या निमित्ताने उफाळतो आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यासाठी संगमनेरमध्ये विखे अन् थोरात यांच्या गटात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. जयंतीनिमित्ताने उभारण्यात येत असलेल्या देखाव्यातून संघर्षाची लढाई शिगेला पोचली आहे. संगमनेर का किंग कौन? असे दोन्ही गटाकडून दाखवण्याच्या स्पर्धेतील, हा राजकीय संघर्षाचा ताण मात्र प्रशासनावर येताना दिसतो आहे.
संगमनेर बसस्थानक परिसरात शिव जयंती निमित्ताने देखावा उभारण्यासाठी दोन्ही गटांमध्ये बरेच दिवस तणाव होता. आता दोन्ही गटाकडून भव्य देखावे उभारत आपापल्या नेत्यांचे वर्चस्व दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. यातून संगमनेर मतदारसंघात विखे (Radhakrishna Vikhe) अन् थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष काही संपताना दिसत नाही.
भाजप मंत्री विखे पाटलांच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत संगमनेरमध्ये परिवर्तन घडवून आणले. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आता त्यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे संगमनेर विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.
शिवजयंती निमित्ताने या दोन आमदारांमध्ये शक्ती प्रदर्शनासाठी चढाओढ सुरू आहे. संगमनेर बसस्थानक परिसरात शिवजयंती उत्सवानिमित्त देखावा उभारण्यासाठी जागेवरून दोन्ही गटांमध्ये बरेच दिवस तणाव होता. मात्र आता बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला भव्य देखावे उभारण्याचे काम सुरू आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्याचे काम सुरू असून कमानीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. दुसरीकडे विखे गटाकडून किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू असून कमानीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने संगमनेर मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे संगमनेरमधील यंदाच्या शिवजयंती उत्सवाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले असून संगमनेर का किंग कौन? अशी चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.