
Ratnagiri : कोकणात कधीकाळी शिवसेना ठाकरे गट मजबूत होता. त्यापाठोपाठ येथे काँग्रेस रूजली आणि वाढली होती. पण शिवसेनेच्या फुटीनंतर आणि झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला उभारी आलेली नाही. उरली-सुरली शिवसेना देखील आता गटकाळ्या खाताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ऑपरेशन टायगरमधून शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडत सुटली आहे. तर भाजप देखील सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमातून तळागाळापर्यंत जाण्याची वाट निर्माण करत आहेत. अशावेळी रत्नागिरीत आलेल्या राजकीय वादळात काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे.
रत्नागिरीत जिल्ह्यावर 1972 पासून ते 1990 पर्यंत काँग्रेस पक्षाचे मोठे वर्चस्व होते. त्यानंतर काँग्रेसला जिल्ह्यात नेतृत्व न मिळाल्याने पडझड सुरू झाली ते आतापर्यंत सुरूच आहे. गेल्या 35 वर्षांपासून उभारीसाठी काँग्रेसची येथे धडपड सुरू असून यात यश आलेलं नाही. पक्षांतर्गत कुरघोड्या, पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजणारे नेते, एकमेकाला कमी दाखवण्यासाठी उघड उघड भांडणारे गटतट यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे. देशातील एकेकाळच्या राष्ट्रीय पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.
काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर येवून गेले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पडझडीचा घेतलेला आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांसह प्रमुख नेते, दुसऱ्या आणि तिसर्या फळीतल्या नेत्यांना कानमंत्रही दिला. मात्र 35 वर्षात पक्षाची झालेली वाताहात आणि पडझडीचं काय? ते आता काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी बळ देणार का? यासाठी नवी टीम कशी उभी करणार असे प्रश्न विचारले जातायत.
जिल्ह्यात 1972 दरम्यान काँग्रेसच हा सर्वात मोठा पक्ष होता. जवळजवळ सर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा पगडा होता. त्यानंतर जनता दल, भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरंग लावत पोखरायला सुरवात केली. 1978 नंतर काँग्रेसची मक्तेदारी भाजप आणि जनतादलाने मोडित काढत जिल्ह्यात पाय पसरायला सुरवात केली.
काँग्रेसच्या शांताराम पेजे यांना भाजपच्या कुसुमताई अभ्यंकर यांनी 1978 मध्ये पराभूत केले. तर यानंतर त्यांनी 1980 साली काँग्रेसच्या शिवाजीराव जड्यार यांना देखील पराभवाची धूळ चारली. येथे झालेल्या पराभव काँग्रेसला काही पूसता आला नाही तो नाही. यानंतर रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, दापोली मतदार संघात भाजप आणि जनतादलाने वर्चस्व निर्माण केले.
दरम्यान मधल्या काळात काँग्रेसने काँग्रेसला शिवाजीराव जड्यार यांना बळ देत 1985 ला आमदार केलं. त्यानंतर काँग्रेसला नवे बळ मिळाले होते. पण आता अशी उभारी काँग्रेसला परत मिळवता आलेली नाही. जिल्ह्यात काँग्रेसची पडझड झाली. ती सुरूच आहे.
जिल्ह्यात सध्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून वाद असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरीही अॅड. सुजित झिमण जिल्हाध्यक्ष असताना रमेश कीर असा वाद उफाळला होता. त्यामुळे गटातटाच्या राजकारणामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. रमेश कीर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद चालून येऊनही त्यांना काँग्रेसला उभारी देता आली नाही. उलट जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये गट पडले.
शहराध्यक्षाच्या निवडीमध्ये देखील एवढा गोंधळ उडाला की दोन शहराध्यक्ष करावे लागले. यामुळे या दोघातील शहराध्यक्ष कोण यावरूनही वाद विकोपाला गेला. ज्यामुळे एका शहराध्यक्षाने कार्यालयाला कुलुप ठोकले. हा वाद कमी होतो न होतो तोच तालुकाध्यक्षाच्या निवडीवरूनही गोंधळ उडाला. जिल्ह्यात पक्षासाठी काम करणारा कट्टर कार्यकर्ता मिळत नसल्याने काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे.