Nashik Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण याची चर्चा होती. त्यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल (Shirish Kotwal) यांचे नाव चर्चेत आले होते.
आता, कोतवाल यांनी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नाशिकच्या काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच कोतवाल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा अक्षरशः क्लास घेतला.
'भाजपला (BJP) उत्तर द्यायचे असेल, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशाचा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, शेतकरी आंदोलने आणि देशाचा सामाजिक इतिहास वाचला पाहिजे. रोज वर्तमानपत्र, अग्रलेख आणि त्यातील वैचारिक लेख वाचले पाहिजेl. आपण वाचले तर भाजपच्या खोट्या प्रचाराला सडेतोड उत्तर देऊन त्यांना निरुत्तर करू शकतो.
असा आक्रमकपणा प्रत्येक कार्यकर्त्याने निर्माण केला पाहिजे. मला तेच अपेक्षित आहे. आणि त्यासाठी तुमचा पाठिंबा हवा आहे. तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही? हे सांगा,' असा सवाल शिरीष कोतवाल यांनी केला. काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनीदेखील हात वर करत त्यांना पाठिंबा दिला.
'भाजपच्या व्हाॅट्सअॅप युनिव्हर्सिटीचे अडाणी लोक द्वेष पसरवतात. काँग्रेसविषयी खोटी माहिती देतात. त्याला त्याच्या दुप्पट आक्रमकपणे उत्तर आपण दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष मुस्लिमधार्जिणा आहे, असा आरोप भाजप करते. मात्र, काँग्रेसचा विचार सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मता हा आहे.
दोन धर्मात द्वेष पसरवणे हे भाजपचे काम आहे. इंदिरा गांधी यांनी पारशी व्यक्तीशी विवाह केला तर त्या मुस्लिम? आणि स्मृती इराणी यांनी पारशी व्यक्तीशी विवाह केला तर त्या हिंदू कशा? हा प्रश्न भाजपला प्रत्येकाने विचारला पाहिजे. तसे केले तर भाजपवाले पळून जातील, असे आवाहन कोतवाल यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोतवाल म्हणाले, आपण सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संबंधित आहोत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट केली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. मात्र, शहरात आल्यावर तो भाव दुप्पट झालेला दिसतो. ही मधली दलाली कोण खातो?. हे आपण शहरातल्या आपल्या बांधवांना समजून सांगितले पाहिजे.
नोटबंदी आधी किमान शेतकरी तग धरून होता. नोटबंदीने त्याचे कंबरडे मोडले. भाजपचे सरकार पुन्हा आले, तर शेतकऱ्यांच्या कमरेला लंगोटीदेखील राहणार नाही. पंजाबचे शेतकरी आज आंदोलन करत आहेत.
हे आंदोलन तुमच्या आमच्यासाठी आहे. या शेतकऱ्यांवर भाजप सरकारने गोळीबार केला. असे सरकार तुम्हाला चालणार आहे का, हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडला पाहिजे, असे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे.
कोतवाल म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई सबंध देश जागरूक झाला. लाखो लोक त्यात सहभागी झाले. राहुल गांधींच्या भाषणांनी प्रेरित झाले. जे लोक कधीही काँग्रेसला मतदान करत नव्हते, त्यांनी मला भेटून आम्ही आता काँग्रेसला मतदान करणार असे सांगितले.
जर मतदार एवढे चार्ज होत असतील, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटून उठायला नको का? असा प्रश्न त्यांनी केला. तोच तोच पणा काँग्रेस कार्यकर्ते सोडणार आहेत की नाही?. आज आपण जे मतदान करणार आहोत ते राहुल गांधी यांच्यासाठी करणार आहोत. आपला देश वाचविण्यासाठी करणार आहोत. म्हणून पंतप्रधान मोदी यांचे सरकार घालवण्याचे ध्येय प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
रामनवमीच्या कार्यक्रमात प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. राम हा भाजपची मोनोपली नाही. तो आपलादेखील आहे. आपले पूर्वज आणि आपण रामाची पूजा करतच होतो. फक्त आपण त्याचे राजकारण केले नाही. आता आपण मोठ्या संख्येने रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होऊया. असे केले तर भाजपवाले निरुत्तर होतील, असेही कोतवाल यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.