मालेगाव: तालुक्यातील (Malegaon) महत्त्वाचे गाव असलेल्या सैंदाणे (Saundane) ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारात असलेली चुरस निकालानंतर जाणवली नाही. पालकमंत्री व शिंदे गटाचे दादा भुसे (Dada Bhuse) यांचे समर्थक शीतल पवार यांचा एकतर्फी विजय झाला. त्यांनी माजी पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे समर्थक रत्नाकर पवार (Ratnakar Pawar) यांची सत्ता काबीज केली. (Dada Bhuse supporetr defeat Girish Mahajan follower)
तालुक्यातील दाभाडी पाठोपाठ तालुक्यात उत्सुकता लागून असलेल्या येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक युवासेनेचे चेतन पवार यांच्या पत्नी शीतल पवार यांनी मोठ्या मताधिक्क्याने एकतर्फी विजय साकार केला. विरोधी उमेदवारांना दोघा उमेदवारांना पाचशे मतांचा पल्ला गाठणेही शक्य झाले नाही. शीतल पवार यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्या मातोश्री दगुबाई पवार यांचा पराभव केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत १५ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध विजयी झाले होते. माजी सरपंच मिलिंद पवार व चेतन पवार यांचा गट एकत्र आल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला होता. तथापि, सरपंचपद व उर्वरित दोन जागांसाठी मतदान झाले. सरपंच पदासाठी दुरंगी लढाई होईल असे चित्र होते.
प्रत्यक्षात निवडणूक एकतर्फीच झाली. शीतल पवार यांनी माजी जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार यांच्या सासू व सदस्य रत्नाकर पवार यांच्या मातोश्री दगुबाई पवार तसेच ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रल्हाद पवार यांच्या पत्नी अंजना पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये रंजना पवार व तीन मध्ये अक्षय पवार हे विजयी झाले. मतदानाच्या दिवशी दाट लग्नाची तिथी व परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरु असल्याने मतदानावर परिणाम झाला.
नवीन मतदारांची संख्या वाढूनही मतदानाची टक्केवारी कमी झाली. यामुळे चर्चांना उधाण आले होते. सौंदाणे ग्रामस्थांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बाजूने कौल देतानाच युवानेते चेतन पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. उपसरपंचपदी मिलिंद पवार समर्थक भाजप उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीतील बिनविरोध विजयी उमेदवार :
वॉर्ड क्रमांक एक - शुभांगी पवार, मीना माळी, चंद्रकांत पवार. वॉर्ड दोन - महारु सोनवणे, कल्पना पवार. वॉर्ड तीन - सोनाली पवार. वॉर्ड चार - प्रवीण छाजेड, उत्तम पवार, रत्ना पवार. वॉर्ड पाच - शशिकांत पवार, सीमा आहिरे, मनीषा पवार. वॉर्ड सहा - किरण पवार, युवराज खैरनार, राजसबाई पवार.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.