Adway Hiray v/s Dada Bhuse : पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभा निवडणुकीचा धसका घेऊन माझ्या व माझ्या कुटुंबाविरोधात षडयंत्र रचले आहे. मात्र, मी तुरुंगात गेलो तरी, तुरुंगातून उमेदवारी करून दादा भुसे यांचा पराभव करीन, असे आव्हान शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी दिले आहे. (Adway Hiray says, Dada Bhuse made conspiracy against my Family)
शिवसेना (Shivsena) उपनेते डॉ. अद्वय हिरे आणि पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यातील राजकारण (Malegaon) टोकाला गेले आहे. या पार्श्वभूमीवर हिरे यांनी भुसे यांना आव्हान देत, मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसे मालेगाव मतदारसंघातील राजकारणाला अक्षरशः उकळ्या येऊ लागल्या आहेत. पारंपरिक हिरे विरुद्द भुसे यांच्या राजकीय वादातून गेल्या आठवड्यात हिरे यांच्या कुटुंबाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पालकमंत्री भुसे यांनी आपल्या विरोधातील षडयंत्राचा भाग म्हणून आपल्या कुटुंबीयांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे.
यासंदर्भात हिरे यांच्या समर्थकांनी मोर्चा काढून भुसे यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मोर्चाला मतदारसंघातील हिरे समर्थक मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. त्यामुळे विधानसभेतील राजकारण तापल्याचे चित्र आहे. यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी सातत्याने एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप सुरू ठेवले आहेत.
यासंदर्भात डॉ. हिरे यांनी फेसबुकवर आपला एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी विधानसभेची निव़डणूक टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी हे षडयंत्र रचले आहे. माझ्या अर्धांगवायू झालेल्या ७० वर्षांच्या वडिलांना तुरुंगात टाकून निवडणूक टाळण्याचा त्यांचा डाव असेल, तर तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मी तुरुंगातून उमेदवारी अर्ज दाखल करून भुसे यांचा पराभव करीन, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
तालुक्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. दोन दशकांपासून राजकारणापासून माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे अलिप्त आहेत. या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात घराघरांत पाणी, वीज, आरोग्यसेवा व रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या षडयंत्रामागे पालकमंत्री दादा भुसे यांचा हात आहे. ड्रग प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा खटाटोप आहे, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करू. हिरे कुटुंबीयांवर राजकीय सूड भावनेने खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र न थांबल्यास आगामी काळात बिऱ्हाड आंदोलन उभारू, असा इशारा शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा समन्वयक पवन ठाकरे आदींसह विविध नेत्यांनी दिला. एकंदरच यातून मालेगाव मतदारसंघातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळे आगामी काळात हे राजकारण कोणत्या वळणावर जाईल, याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.