Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

Dada Bhuse News; दाभाडीच्या सरपंचपदाची निवडणूक बनली प्रतिष्ठेची?

दाभाडीत रंगलय पालकमंत्री भुसे आणि हिरे यांच्यात छुपे डावपेच

मालेगाव : जिल्ह्याचे (Nashik) लक्ष लागून असलेल्या राजकीयदृष्ट्या जागृत दाभाडी (Dabhadi) ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहा वॉर्डातील १६ जागांसाठी ५२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये तीन पॅनेल असले तरीही पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांचे परंपरागत विरोधक अद्वय हिरे यांच्या समर्थकांत चुरस आहे. त्यात या नेत्यांनी छुपे डावपेच खेळले आहेत. (Traditional political antagonist Bhuse & Hire playing hidden cards)

Dada Bhuse
Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

सरपंचपदाच्या रिंगणातील गिरणाकाठ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निकम यांचे दाभाडी ग्रामविकास पॅनल, माजी पंचायत समिती सभापती शशिकांत निकम यांचे जनसेवा, बाजार समितीचे माजी संचालक संजय निकम यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात आहेत.

Dada Bhuse
Manikrao Kokate news; सिन्नरच्या निवडणुकांत कोकाटे समर्थक जोमात?

याशिवाय नानाभाई निकम व संयोग निकम हे दोघे उमेदवार आहेत. या निवडणुकीमुळे दाभाडी गाव व परिसर प्रचार फलकांनी व्यापला आहे. प्रचाराचे ७० पेक्षा अधिक प्रचार फलक असून, नैमित्तिक वाढदिवस, पुण्यस्मरण, श्रद्धांजली फलक लावण्यास जागादेखील शिल्लक नाही. फलक युद्ध रंगले असताना अखेरच्या दोन दिवसात आर्थिक उलाढालही जोमाने असेल. मतदार नवनेतृत्व स्विकारणार की प्रस्थापितांना संधी देणार याविषयी उत्सुकता आहे.

दाभाडीतील बाजार तळ, कमान, जवाहर नगर, शिव रस्ता, सी सेक्शन, दौलती स्कुल, इंदिरा नगर, पेठ रस्ता, कारखाना, रोकडोबा नगर, नवी वसाहत, बसस्थानक यासह विविध ठिकाणी फलक झळकले. दाभाडी ग्रामविकास पॅनलचे सोळा उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार असे प्रत्येकी एक-एक फलक आहेत. याउलट जनसेवा पॅनल व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने सहा वॉर्डातील उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार असे स्वतंत्र सहा फलक लावले आहेत.

यामुळे फलकांची भाऊगर्दी झाली आहे. फलकयुद्ध पाहून मतदार राजाबरोबरच बाहेरुन येणारे- जाणारे प्रवासी, नातेवाईकही चक्राऊन गेले आहेत. प्रचारसभा, आरोप- प्रत्यारोपांनी प्रचारात रंगत आणली आहे. तिघा प्रमुख उमेदवारांनी सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सरपंचपदासाठी पालकमंत्री दादा भुसे समर्थक तीन उमेदवार समोरासमोर आहेत. तिघा उमेदवारांच्या प्रचार पत्रकांवर श्री. भुसे यांची छबी आहे. यामुळे तुर्त गाव पातळीवरील निवडणुकीत भुसे यांनी नेमके कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकले, हे कोडेच आहे.

उमेदवारांचे समर्थक भुसे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे सांगतात. अद्वय हिरे गटाचे संजय निकम हे एकमेव उमेदवार आहेत. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य संयोग निकम कुठवर मजल मारणार याविषयी उत्सुकता आहे. ग्रामपंचायतीसाठी एकूण १५ हजार ६०३ मतदार आहेत. १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

एक खोक्याची निवडणूक

सरपंचपदासाठी विजयी उमेदवाराला किमान साडेचार हजार मतांचा पल्ला गाठावा लागणार आहे. यातील पाच ते सात हजार मतदारांना उमेदवाराकडून शिधा अपेक्षित आहे. चुरशीची निवडणूक पाहता फुलीचा दर पाचशे रुपये असेल. सरपंचपदासाठीच्या पाचपैकी दोन किंवा तीन उमेदवारांनीही शिधा वाटप केला तरी हा हिशेब खोक्यात जातो. याशिवाय जेवणावळींचा खर्च वेगळा. आतापर्यंत चौक, गट, तट, मंडळ, संघटना अशा पार्ट्या सुरु होत्या. एकत्रित जेवणावळी दोन दिवसात झडतील. एकूणच दाभाडी ग्रामपंचायत निवडणुकीची चुर्रस दिवसेंदिवस वाढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com